महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुप्त तळघर! तळघरात सापडल्या पुरातन पाच मूर्ती; पादुकासह बांगड्यांचा तुकडे, नाणी यांचाही समावेश

04:56 PM Jun 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
Pandharpur Sri Vitthal-Rukmini temple
Advertisement

पंढरपूर संतोष रणदिवे

महाराष्ट्रासह परराज्यातीलही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. याच दरम्यान, हनुमान गेटजवळ पुरातन विभागाच्या कर्मचान्यांना विठ्ठल मंदिरात तळघर आढळून आले आहे. तेथे अधिक संशोधन केले असता तीन ते चार मूर्ती मिळून आल्या आहेत. याशिवाय काही नाणी, बांगड्याही मिळून आल्या आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

वारकऱ्यांसह भक्तांमध्ये औत्सुक्य दरम्यान, आगामी आषाढ वारी आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे महत्व समोर आले आहे. हे मंदिर नक्की किती पुरातन असेल याबाबत मोठी चर्चा विठ्ठल भक्तांसह वारकरी सांप्रदाय आणि राज्यभर सुरु झाली आहे. या वृत्तामुळे यंदा पंढरीत भक्तांची मांदियाळी आणखी वाढण्याचीही शक्यता आहे.
मार्चपासून संवर्धन आहे सुरु

Advertisement

समस्त वैष्णव आणि वारकरी सांप्रदायाचे आराध्य असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सध्या जतन आणि संवधनाचे कार्य सुरु आहे. यासाठी पुरातत्व विभाग अतिशय सजगतेने गेल्या मार्च महिन्यापासून या ठिकाणी कार्यरत आहे.

संवर्धनाचे आणि जीर्णोद्धाराच्या या कामासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून निधी पुरवण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी जसे हे मंदिर पाहिले, अनुभवले अगदी तसेच पुन्हा उभारले जात आहे. गाभारा परिसरातील काम पूर्ण करण्यात आले असून येत्या २ जूनपासून पदस्पर्श दर्शनही सुरु करण्यात येणार आहे.

हनुमान गेटजवळ दिसले तळघर
याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसरामध्ये पुरातत्व विभागाचे कर्मचारी गुरुवारी सोळखांबी परिसरातील हनुमान गेटजवळ काम करीत होते. काम सुरू असताना एक दगड निसटला असल्याचे दिसून आले. तेव्हा हा दगड काढल्यावर आतमध्ये सहा ते आठ फूट तळघर असल्याचे दिसून आले आहे.

त्यानंतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अतिशय हळुवारपणे आणि काळजीपूर्वक काम सुरु करण्यात आले. ५० किलो माती काढल्यावर सापडल्या मूर्ती अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये या तळघराचे प्रवेशद्वार अरुंद असल्याचे दिसून आले तसेच आतमध्ये मातीच्या ढिगाऱ्यामध्ये मूर्ती असल्याचे जाणवून आले. पहिल्यांदाच अशा पध्दतीचे तळघर आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तळघरात काही मूर्तीही आढळून आल्या आहेत. या मूर्तीची पुरातत्व विभागाच्या अधिकारी व तज्ज्ञांनी मंदिरात दाखल होऊन अतिशय काळजीपूर्वक हातकणी करत पाहणी केली. या ठिकाणी असलेली माती सध्या बोहर काढली जात आहे. जवळपास ४० ते ५० किलो माती बाहेर काढल्यानंतर या मूर्ती आढळल्या.त्याचे परीक्षण केले जाणार आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या तळघरात आणखी पाहणी केली असता सहा बाय सहा फुटाचे चेंबर आढळून आले. त्याममध्ये खूप माती असून ती बाहेर काढली जात असल्याचे सांगितले.

१५ ते १६ व्या शतकातील मूर्ती मंदिरात आढळलेल्या या तळघरामध्ये ३ मोठ्या दगडी मूर्ती मूर्ती सापडल्या आहेत. तसेच एक पादुकाही सापडली असून दोन लहान मूर्तीही आहेत. पुरातत्व विभागाचे संचालक विलास वाहने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची तपासणी सुरु आहे. या मूर्ती १५ ते १६ शतकातील असतील असा दावा करण्यात येत आहे. यातील एक मोठी मूर्ती व्यंकटेशाची असावी, असा अंदाज आहे. या मूर्तीबाबत अभ्यासाअंतीच ठोस निष्कर्ष काढला जाऊ शकतो, असे वाहने यांचे म्हणणे आहे.

मूर्ती पंधरा ते सोळाव्या शतकातील असाव्यात तळघरात दोन विष्णु अवतारातील एक महिषासूरमर्दिनी मूर्ती सापडल्या आहेत तर दोन लहान मूर्ती सापडल्या असून पादुका देखील सापडल्या आहेत. तळघरात बागड्यांचे तुकडे, जुनी पैशांची नानी देखील सापडली आहेत. सर्व मुर्ती या दगडी पाषाणातील आहेत. या मुर्ती पंधरा ते सोळाव्या शतकातील असाव्यात. मूर्ती जरी फुटलेल्या तडे गेलेल्या असल्या तरी त्या त्या काळात दुरुस्त देखील केल्याचे दिसून येते. दुरुस्तीसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे.

-विलास वाहने,सहायक संचालक, पुरातत्व विभाग

काय काय सापडले.

या तळघरामध्ये सध्या ३ मोठ्या दगडी मूर्ती, २ छोट्या मूर्ती आणि १ पादुका असे अवशेष सापडले आहेत. त्यासोबत मातीत काचेच्या बांगड्या, त्याचे तुकडे आढळले आहेत. काही जुनी नाणी मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. हे बांधकाम चुन्याचे प्लास्टर आहे. आणखीही काही दगडी मूर्ती तळघरात असाव्यात असाही अंदाज आहे.या ठिकाणी जे काही सापडेल त्याची तपासणी करुनच त्याचा संपूर्ण अहवाल शासनानेकडे सादर केला जाणार आहे.

तज्ज्ञांच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही
डॉ. राजेंद्र शेळके म्हणाले,याविषयी पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, शासन आणि पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ अधिकारी यांच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही डॉ. शेळके यांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जतन व संवर्धन करून मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचे पुरातन सौंदर्य रूप देण्याचे काम पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तेजस्विनी आफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहे. त्यामुळे १५ मार्चपासून पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या २ जूनपासून मंदिर पुन्हा भाविकांसाठी सुरू होत आहे.

पत्रकार परिषदेस मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी, पुदलवाड, पुरातत्व विभागाचे, विलास पहाडी, तेजस्विनी, आफळे आदी उपस्थित होते.

Advertisement
Next Article