For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंढरीचा ध्यास

06:47 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंढरीचा ध्यास
Advertisement

या भौतिक जगामध्ये अनेक भगवान श्रीकृष्णांची मंदिरे आहेत पण सर्वांना कोठेही भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवण्याचा सहसा अनुभव नाही. पण पंढरपूरचे पांडुरंग इतके कृपाळू आहेत की येथे हरिभक्त प्रत्यक्ष पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवू शकतो. येथे आपणास भगवंताच्या चरणांना स्पर्श करण्याची परवानगी आहे. भगवंतांनी रोगी-निरोगी, गरीब-श्रीमंत, पुण्यवान-पापी, अधर्म इत्यादी सर्वांना आपले चरणकमळे अर्पण केलेली आहेत. कुणीही त्यांच्या चरणांना स्पर्श करू शकतो, खरोखरंच असा उदार देव कोणी कोठे पाहिला आहे?

Advertisement

पंढरपूर धामामध्ये सर्वच कांही विशेष आहे ज्यामुळे पंढरपूरच्या वास्तव्याला आलेले हरिभक्त हे प्रत्यक्ष विठ्ठलाचा ध्यास घेऊन घरातून निघतात आणि पंढरपूरला आल्यावर तो प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यावर त्यांचे मनुष्य जीवन परिपूर्ण झाल्याचे त्यांना विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवल्यावर अनुभव येतो. अशा ह्या भूवैकुंठ पंढरपूर येथे या पांडुरंगाचे, त्यांच्या भक्तांचे व पंढरीचे सारे वैभव काही आगळेच. येथे भक्त श्रेष्ठ-कनिष्ठपण विसरतात, भक्तिप्रेमाच्या अमृतरसात न्हाऊन निघतात.

अशा या विशेष पंढरपूर धामाबद्दल आत्मियता असलेले संत तुकाराम पाहतात. उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ।।1।। ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटे वरी देव कोठे।।धृ.।। ऐसे संतजण ऐसे हरीदास । ऐसा नाम घोष सांगा कोठे।।2।। तुका म्हणे आम्हां अनाथां कारणे । पंढरी निर्माण केली देवे ।।3।।

Advertisement

अर्थात “आम्ही खूप तीर्थक्षेत्रे पाहिली खूप तीर्थक्षेत्रांच्या महिमेचे वर्णनदेखील ऐकलेले आहे, परंतु अशी चंद्रभागा असे भीमा तीर आणि असा विटेवर उभा असलेला देव कोठे आहे? असे संतजन असे हरिदास आणि असा नामघोष कोठे आहे ते सांगा? तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा अनाथांसाठी पांडुरंगाने पंढरी हे क्षेत्र निर्माण केले आहे.

अशा पंढरपूर धामामध्ये पांडुरंगाला भक्तिप्रेमाच्या भावनेने ओढून आणणाऱ्या पुंडलिकाची आठवण करत कृतार्थ अंत:करणाने तुकाराम महाराज म्हणतात धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ।।1।। न करी आळस आलिया संसारी । पाहे पा पंढरी भूवैकुंठ ।।ध्रु.।।  न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें।।2।।  सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ।।3।। विष्णुपद गया रामनाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या।।4।। तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नाश अहंकाराचा।।5।।

अर्थात “हे पुंडलिका तू धन्य आहेस तू एक फार चांगले काम केले आहे ते म्हणजे विठ्ठलऊपी निधान तू पंढरपुरला आणले आहेस. अरे मानवा तू या संसारात जन्माला आला आहेस त्यामुळे तू आळस करू नकोस तू भूवैकुंठ अशा पंढरीचे दर्शन नक्की घे. तपाच्या राशी करून देखील जे ब्रम्ह प्राप्त होत नाही ते ब्रम्ह या पुंडलिकाने सामान्य लोकांना दाखवले आहे. जिथे तीर्थक्षेत्र, देव एकत्र असतात ते स्थान पवित्र आहे. विष्णुपद, गया, रामनाम आणि काशी ही सर्व विठ्ठलाच्या पायापाशी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या श्र्रद्धावान भक्ताने विठ्ठल ऊक्मिणी मंदिराचा कळस जरी पाहिला तरी त्याचा तत्काळ अहंकार नाश पावतो व त्याला मोक्ष प्राप्त होतो.”

दुसऱ्या एका अभंगात पुंडलिकाची स्तुती करताना म्हणतात पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ।।1।। पांडुरंग बाळमूर्ती । गाईगोपाळां सांगती । येऊनियां प्रीति । उभें समचि राहिलें ।।ध्रु.।। एका आगळें अक्षर । वैकुंठचि दुसरें । म्हणविती येरें । परि ती ऐसीं नव्हेती ।।2।। पाप पंचक्रोशीमधीं । येऊ न सकेचिना आधीं । कैंची तेथें विधि । निषेधाची वसति ।।3।। पुराणें वदती ऐसें । चतुर्भुज तीं मानसें । सुदर्शनावरी वसे । न बुडे हे कल्पांतीं ।।4।। अनुपम्य इची थोरी । महाक्षेत्र महीवरी । धन्य धन्य वारकरी । तुका म्हणे तेथींचे ।।5।।

अर्थात “पुंडलिक हा भक्तांचा राजा असून त्याने फार मोठे कार्य साध्य केले आहे. ते म्हणजे असे की वैकुंठात राहणारे परब्रम्ह पंढरीत त्याने आणले आहेत. पांडुरंग बाळमूर्तीत गायी गोपाळांबरोबर होता, तेच परब्रम्ह पुंडलिकाच्या प्रेमाकरता आपले दोन्ही चरण विटेवर सारखे ठेवून उभे राहिले आहेत. हे पंढरी क्षेत्र म्हणजे वैकुंठापेक्षा एका अक्षराने अधिक असून भूवैकुंठच आहे. इतरही अनेक स्थाने आहेत की ज्यांना तीर्थक्षेत्र असे म्हटले जाते परंतु पंढरीसारखे तीर्थक्षेत्र दुसरे नाहीच. पंढरी क्षेत्राच्या पंचक्रोशीत देखील पाप कधीच येऊ शकत नाही. मग तेथे विधिनिषेधाची वस्ती कशी असेल? पुराण असे सांगते की पंढरीतील माणसे चतुर्भुज आहेत. पंढरी हे क्षेत्र भगवान विष्णूच्या सुदर्शनावर वसलेले क्षेत्र आहे त्यामुळे कल्पाच्या अंती देखील ते कधीच बुडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात ही पंढरी पृथ्वीवरील महाक्षेत्र आहे तिची थोरवी अनुपम्य आहे. मग तेथे जाणारे जे वारकरी आहेत ते धन्य धन्य आहेत.”

अशा या पंढरपूरचा ध्यास ज्यांना लागला आहे त्या हरिभक्तांची भावना व्यक्त करताना तुकाराम महाराज म्हणतात पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ।।1।। न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ।।2।। तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दु:ख जाय सर्व माझें ।।3।। अर्थात “पंढरीसी जावे असे माझ्या मनाला वाटत आहे ही विठाबाई माझी जननी मला कधी भेटेल असेही वाटत आहे. त्यावाचून मला कोणताही सोहळा सुखाचा वाटणार नाही कारण माझ्या अंगाला जणू अग्नीचा दाहच लागलेला आहे असेच मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “एकदा की त्या विठाईचे मी पाय पाहिले की माझे सर्व दु:खच जाईल.”

या अभंगात विटेवर उभा असलेला विठ्ठल आपल्या कुठल्या भक्तांची वाट पाहत आहे याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा।।1।। जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ।।2।। तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं। त्याची चक्रपाणी वाट पाहे ।।3।। अर्थात “संपदा सोहळा मनाला आवडत नाही तर केवळ पंढरीचा ध्यास मनाला लागलेला आहे. पंढरीला जाणे मनाला फार आवडते आणि कधी आषाढी एकादशी येईल आणि मी पंढरपूरला जाईल असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात अशी आर्त इच्छा ज्याच्या मनात असते त्याची चक्रपाणि हरी वाट पाहत असतो.”

पंढरपूरच्या वेशीवर येऊन कधी एकदा विठ्ठल-ऊक्मिणी मंदिराचा कळस पाहीन असा ध्यास लागलेले तुकाराम महाराज म्हणतात साधन संपत्ती हेंचि माझें धन । सकळ चरण विठोबाचे।।1।। शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळीच नीट सुखरूप।।ध्रु.।। वैष्णवांचा संग राम नाम गाणें । मंडित भूषणे अळंका।।2।। भवनदी आड नव्हतीसी जाली। कोरडीच चाली जावें पायी ।।3।।मायबाप दोघें पाहातील वाट। ठेवूनिया कटीं कर उभी ।।4।। तुका म्हणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ।।5।। अर्थात “विठोबाचे चरण हीच आमची साधनसंपत्ती आहे व हेच आमचे धनही आहे. पंढरीची वाट म्हणजेच माझ्या माहेरची वाट आहे. ही वाट शांत, जवळची, सरळ आणि सुखाची आहे. वैष्णवांची संगती आणि त्यांच्या संगतीत ‘राम’ नामांचे गीत गाणे हीच आमची भूषणे आणि अलंकार आहेत, आणि या अलंकार- भूषणांनी आम्ही सुशोभित झालो आहोत. ही भवनदी कधीच आम्हाला आड आली नाही, आणि कोरड्या पायाने चालत जावे, अशी स्थिती झाली आहे. माझे मायबाप श्रीरूक्मिणी-पांडुरंग, ही दोघे कटीवर हात ठेऊन माझी निरंतर वाट पाहात असतील. तुकाराम महाराज म्हणतात, मी पंढरीला जाऊन केव्हा श्री विठ्ठल ऊक्मिणी मंदिराचा कळस बघेन, असे झाले आहे आणि त्यामुळे आळस, निद्रा, भूक ही सारी पळाली आहेत.” अशा भावनेत हरिभक्त पंढरपुरात आल्यावर भक्तवत्सल भगवंत विठ्ठल आपल्या चरणावर प्रेमाने आश्र्रय देतात.

-वृंदावनदास

Advertisement
Tags :

.