Solapur : दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली तर आता लगेच होणार पंचनामे
सोलापूरमध्ये नैसर्गिक आपत्तीसाठी पंचनामा अॅप लाँच
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. या काळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना महसूल प्रशासनासमोर अनेक अडचणी समोर येत्या होत्या. यामुळे पंचनामे होण्यास विलंब लागत होता. मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल खात्याने पंचनामा अॅप विकसित केला आहे.
यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अचूक व गतीने पंचनामे होणार आहेत. यंदा सोलापूर जिल्हाभरात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. सोलापूर शहरातही अतिवृष्टीमुळे अनेक घरांत पावसाचे पाणी शिरुन मोठे नुकसान झाले. या परिस्थितीत राज्य शासनाच्या सूचनेनुसार नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याबरोबरच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास यंदा प्रशासनाचा वेळ सर्वाधिक गेला. शेती पिकांच्या पंचनामे करताना यापूर्वी अनेक चुका राहत होत्या. अनेकदा नुकसानग्रस्त भागात न जाताही पंचनामे होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कागदपत्रेही राज्य शासनाच्या पोर्टलवर अपलोड करताना अनेक त्रुटी व विलंब होत होता. यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होत होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विकसीत करण्यात आलेला नवा पंचनामा अॅप काही दिवसापूर्वीच लाँच करण्यात आला असून त्याची प्रायोगिक तपासणीही करण्यात आली आहे. तलाठी यांच्याकडे ही प्रणाली देण्यात येणार असून शेतकऱ्यांनाही या प्रणालीतून नुकसानीची माहिती सादर करता येणार आहे.
अॅपमुळे झालेल्या पिकांच्या क्षेत्र, प्रत्यक्षात नुकसानीचे प्रमाण, लोकेशन, शेतकऱ्यांचा सात बारा उतारा, आठ अ, नुकसानीचे छायाचित्र आदी माहिती एकाचवेळी संकलित होणार आहे. त्यामुळे ही माहिती थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचणार एकही बाधित सुटणार नाही जिल्हा प्रशासनाने लाँच केलेल्या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट नुकसानीची माहिती प्रशासनाकडे सादर करता येणार आहे. त्यामुळे दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनामा व मदतीपासून बंचित न राहण्याची मार्ग मोकळा झाला आहे.
. यापूर्वी तलाठी यांच्याकडून तहसीलदारांकडे पंचानामा अहवाल सादर करण्यात येत होता. मात्र अॅपमुळे एकाचवेळी प्रशासनास तातडीने माहिती मिळून यावर नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करता येणे शक्य झाले आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात सप्टेबर महिन्यात अतिवृष्टी झाली. याच काळात महापुराचा फटकाही बसला. यात शेतपिकांचे तर नुकसान झालेच याशिवाय जनावरे व अन्य कृषी साहित्यांचीही नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सुमारे दीड महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे यावर जिल्हा प्रशासनाने अॅपच्या कायमस्वरुपी तोडगा काढत पंचनामा प्रक्रिया अधिक सुलभ, गतीमान व पारदर्शक केला आहे.