आरक्षणासाठी पंचमसाली नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा निष्फळ
बेंगळूर येथे झाली बैठक
बेळगाव : पंचमसाली समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन छेडलेल्या कुडल संगम येथील जगद्गुरु श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजींसह पंचमसाली समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेंगळूर येथे बैठक झाली. पंचमसाली समाजाचा 2 ए प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी स्वामीजींनी या बैठकीत केली. ही बैठक निष्फळ ठरली असून स्वामीजींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी समाजातील नेत्यांशी चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री शिवराज तंगडगी, आमदार विनय कुलकर्णी, विजयानंद काश्यपनवर, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह समाजातील 40 हून अधिक नेते व वकील यावेळी उपस्थित होते.
पंचमसाली समाजाचा 2 ए प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आपले सरकार सामाजिक न्यायाच्या बाजूने आहे. सर्व दुर्बल घटकांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अंतिम शिफारसी अद्याप मिळाल्या नाहीत. सध्या निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे तातडीने निर्णय घेता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी सुवर्णविधानसौधला घेराव घालण्याची घोषणा केली आहे.