पंचमसाली समाजाचा बुधवारी मूकमोर्चा
बसवजय मृत्युंजय महास्वामी यांची माहिती : मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मागील हिवाळी अधिवेशनावेळी आरक्षणासाठी सुवर्णसौध परिसरात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी अमानुषपणे समाज बांधवांवर लाठीमार करण्यात आला होता. यंदा याला वर्षपूर्ती होणार असून या अत्याचाराची आठवण म्हणून बुधवार दि. 10 रोजी गांधी भवनपासून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. प्रशासनाच्या नियमानुसार सुवर्णसौधपर्यंत मूकमोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती बसवजय मृत्युंजय महास्वामी यांनी दिली.
कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महास्वामी म्हणाले, या मूकमोर्चामध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधी, वकील, शेतकरी व हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार आहेत. या मूकमोर्चात समाजबांधव पंचमसाली चन्नम्मा ध्वज, डाव्या हाताला व तोंडाला काळी पट्टी बांधून सहभागी होणार आहेत. मागीलवेळी आंदोलनावेळी समाजबांधवांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. याची आठवण म्हणून ही मूक पदयात्रा काढली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
मात्र याकडे दरवेळी सरकारकडून कानाडोळा करण्यात येत असून केवळ आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मूकमोर्चाच्या माध्यमातून आरक्षण देण्याकडे लक्ष वेधून घेण्यात येणार असून जोरदार मागणी करण्यात येणार आहे. जरी हा मूकमोर्चा असला तरी मुख्य उद्देश पंचमसाली समाजाला आरक्षण मिळवून देणे हाच आहे. यासाठी या मूकमोर्चात मोठ्यासंख्येने समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहनही महास्वामी यांनी केले. यावेळी निंगप्पा पिरोजी, गुंडू पाटील, अॅड. आर. सी. पाटील, अडिवेश इटगी आदी उपस्थित होते.