पंचमसाली आंदोलन तीव्र होण्याची शक्यता
मुख्यमंत्री प्रतिसाद देत नसल्याची बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांची टीका
बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे इतर समुदायांच्या मागण्यांची दखल घेतात, मात्र आमच्या समुदायाला प्रतिसाद देत नाहीत, अशी टीका कुडलसंगमचे बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांनी केली आहे. वीरशैव पंचमसाली समुदायाच्या मागण्यांची दखल घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. कोप्पळ येथे सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. लिंगायत-पंचमसाली आंदोलनाला सरकारने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी इतर समुदायांना प्रतिसाद दिला आहे. परंतु, आमच्या समुदायाच्या बाबतीत त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बेळगाव अधिवेशनावेळी विधानसौधला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 हजार ट्रॅक्टर घेऊन घेराव घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
आमच्यामुळेच काँग्रेस सत्तेवर आला आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही राज्य दौरा केला आहे. आमच्या समुदायातील आमदारांनी मागण्यांसंदर्भात अद्याप कोणत्याही रितीने आवाज उठविलेला नाही. आता अधिवेशनातच आवाज उठवा किंवा आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या. बेळगावमधील आंदोलनासाठी रुपरेषा आखली जात आहे. पंचमसाली समुदायातील लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावे. यात लोकांच्या भावनांचा उद्रेक जाला तर त्याला सरकारच थेट जबाबदार असले. आता कोणत्याही प्रकारचे उपोषण सत्याग्रह करणार नाही, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही जयमृत्युंजय स्वामीजी यांनी केला.
भाजप सरकारमध्ये आमच्या समुदायाचे आमदार, मंत्री बोलत होते. मात्र, आता आमदार समुदायाच्या वतीने बोलत नाहीत. पूर्वी मुख्यमंत्री आमच्या भेटीसाठी उपलब्ध होत होते. निमंत्रण दिल्यावर येत होते. आता तशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्री आमच्या विनंतीला मान देत नाहीत. आम्ही वक्फविरोधात आंदोलन सुरु केले आहे. अनेक निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी वक्फसंबंधी शेतकऱ्यांना नोटिसा पाठविणे बंद केले आहे. मात्र, उताऱ्यातील उल्लेख वगळलेला नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.