पंचगंगा प्रदुषणाची तीव्रता वाढली, साथीच्या आजारांचा फैलाव
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
कोल्हापूर जिह्यात पंचगंगा नदी आणि उपनद्यांच्या काठावर 171 गावे वसलेली आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्यांच्या क्षेत्रभेटी अहवालानुसार 2011 ची जनगणना आणि 40 एलपीसीडी पाणी पुरवठा लक्षात घेऊन 89 गावांमध्ये अंदाजे 18.77 एमएलडी सांडपाणी निर्माण होत असून ते थेट पंचगंगेत मिसळते. तसेच जल जीवन मिशन आणि 40 एलपीसीडी पाणी पुरवठ्यासाठी 2022 ची लोकसंख्या विचारात घेता सुमारे 15.69 एमएलडी सांडपाणी नदीत मिसळते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस या नद्यांवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवले आहे. त्यामुळे दररोज नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली असून नदी काठावरील अनेक गावांत गॅस्ट्रो, अतिसार आणि कॉलराची साथ पसरली आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रबळ इच्छाशक्तीअभावी पंचगंगेचे दुखणे वर्षानुवर्षे कायम आहे.
डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून नेहमीच ‘पंचगंगा आणि प्रदुषित पाणी‘ हा विषय चर्चेला येतो. पंचगंगा नदीकाठावरील गावांमध्ये साथीच्या आजारांचा फैलाव झाला, माशांसह जलचर प्राण्यांचा मृत्यू झाला की नदी प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. मग प्रदुषण कमी करण्यासाठी प्रशासनाच्या शेकडो बैठका होतात आणि प्रदुषण रोखण्यासाठी काय करायला हवे यावर चर्चा सुरु होते. अनेकदा प्रदुषण कमी करण्यासाठी पंचगंगा प्रवाहीत ठेवणे हाच एकमेव उपाय वापरला जातो. पण नदी प्रदुषण रोखण्यासाठी शासनाकडून आणि स्थानिक पातळीवर कोणतीही ठोस उपाययोजना राबवली जात नाही. कोल्हापूरात किंवा पंचगंगेच्या नदीकाठावरील गावात एखादी साथ पसरली तर पंचगंगा प्रवाहीत ठेवणे हा एकमेव पर्याय समोर ठेवून राधानगरी, काळम्मावाडी धरणातून पाणी सोडले जाते. मात्र नदीच्या अंतिम टोकाला इचलकरंजीसह शिरोळ तालुक्यातील 19 गावांच्या आरोग्याचे काय ? या प्रश्नाचे उत्तर अद्यापपर्यंत शोधण्यात आलेले नाही. मुळात पंचगंगा नदी केवळ पावसाळयात प्रवाहीत असते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये ठिकठिकाणी असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी आडवल्यानंतर प्रदुषणाची तिव्रता वाढत जाते.
पंचगंगा नदीकाठावरील 89 गावांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि 30 वर्षांसाठी कायमस्वरूपी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 252.71 कोटी रुपये निधीची गरज आहे. एवढा मोठा आर्थिक भार जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायती उचलू शकत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून राज्य सरकारकडे निधी मागणीचा प्रस्ताव पाठवला होता. पण शासनाने हा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे पुरेशा निधीअभावी पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आणखी काही वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पारंपरिक उपाययोजनांवर द्यावा लागणार भर
उच्च न्यायालयाने पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशानुसार जि.प. कडून संबंधित ग्रामपंचायतींना नदी प्रदूषण नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करून त्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. पण ग्रामपंचायत व जिल्हा परिषद स्तरावर निधी अपुरा असल्याने निधीची वाट न पाहता दरवर्षी काही स्थानिक व पारंपरिक उपाय केले जात आहेत. त्यामध्ये वनराई बंधारे, सार्वजनिक पाझर खड्डे, चेक बंधारे, स्थिरीकरण तलाव, शेतीसाठी पुनर्वापर आणि विसर्जन आणि वसाहती क्षेत्रात कॅना इंडिका, तारो यांसारखी काही झाडे लावली जात आहेत.
जिह्यातील 24 गावे नदी प्रदुषणास सर्वाधिक कारणीभूत
जिह्यातील 24 गावे सर्वाधिक नदी प्रदूषणास कारणीभूत ठरतात. यामध्ये करवीर तालुक्यातील बालिंगा, गांधीनगर, हाळदी, हनमंतवाडा, कांडगाव, कोपार्डे, कोथळी, कुडित्रे, नागदेववाडी, परीते, शिंगणापूर, उचगाव, वाकरे, वळीवडे, वरणगे या पंधरा गावांचा समावेश आहे. हातकणंगले तालुक्यातील चंदूर, हातकणंगले, कबनूर, रुई, शिरोली, तिळवनी या सहा गावांचा समावेश आहे. तर शिरोळ तालुक्यातील नांदणी, नृसिंहवाडी शिरोळ ही गावे सर्वाधिक प्रदूषणास कारणीभूत ठरतात. मध्यम स्वरूपात प्रदूषण करणाऱ्या गावांमध्ये जिह्यातील 9 गावांचा समावेश आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ ठाणे, मोरेवाडी, पाचगाव, पाडळी, वडणगे या पाच गावांचा समावेश आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी, पट्टणकोडोली, रुकडी तर शिरोळ तालुक्यातील शिरदवाड गावाचा समावेश आहे. यामध्ये पाच गावांचा थेट नदी प्रदुषणाशी संबंध येत नसून करवीर तालुक्यातील आंबेवाडी, चिंचवाड, प्रयाग, चिखली, वसगडे तर शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावाचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील कळेसह अन्य काही गावांचे पाणी थेट नदीत मिसळते.
कळे परिसरात अतिसाराच्या रुग्णांत मोठी वाढ
पन्हाळा तालुक्यातील कळे गावांतील सांडपाणी थेट कुंभी-धामणी नदीत मिसळत असल्यामुळे या परिसरातील मल्हारपेठ, सावर्डे, मोरेवाडी, सांगरूळ, मरळी, चिंचवडे, भामटे, कळंबे आदी गावांत अतिसार व गॅस्ट्रोसदृष्य रूग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मल्हारपेठ येथे कॅलराचाही 1 रूग्ण आढळला आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असले तरी कळेतील सांडपाणी रोखून मूळ दुखण्यावर कधी इलाज होणार ? असा प्रश्न कळे परिसरातील नागरीकांतून उपस्थित केला जात आहे.