देशात पणजी सर्वांत स्वच्छ, साखळी उल्लेखनीय
‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-2025’ सालात ठरले अव्वल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंत्री स्वीकारला पुरस्कार
पणजी : स्वच्छ भारत अभियानांर्गत दरवर्षी करण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-2025’ या सालात राजधानी पणजी शहर देशातील सर्वात स्वच्छ ठरले आहे. राज्यांमध्ये सांखळी पालिकेची स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याला हे दोन्ही पुरस्कार प्राप्त झाल्याने राज्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे. 50 हजार ते 2 लाख पर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकांमध्ये पणजी शहराने सर्वात स्वच्छ शहर म्हणून बाजी मारली. राज्यांमध्ये सांखळी पालिकेचे स्वच्छतेच्याबाबतीत आदर्शवादी कार्य ठरले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पणजी महापालिकेला पुरस्कार देण्यात आला, तर सांखळी शहराच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी केंद्रीय नगरविकासमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पुरस्कार दिला. हे दोन्ही पुरस्कार राज्याचे नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांनी स्वीकारले.
यावेळी महापौर रोहित मोन्सेरात व सांखळी पालिकेच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभु व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंत्री राणे म्हणाले, गोव्यासाठी हा एक पुरस्कार नसून, स्वच्छ भारत अभियानांतर्गत हाती घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि परिवर्तनकारी उपक्रमांची पावती आहे. घरोघरी कचरा संकलनापासून ते कचरामुक्त शहर प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंत आणि कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया सुनिश्चित करण्यापर्यंत, पणजीने शहरी स्वच्छतेमध्ये एक आदर्श स्थापित केला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणे हा गोव्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ‘स्वच्छ, स्gxदर सुंदर हरीत गोवा’ हे गोवा सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे, असेही ते म्हणाले. गोव्यातील लोकांचे, आमच्या स्वच्छता पथकांचे आणि सर्व भागधारकांच्या योगदानामुळेच राजधानी पणजी तसेच साखळी शहराला पुरस्कार प्राप्त झाल्याचेही ते म्हणाले.
साखळीचा राज्यस्तरीय गौरव कौतुकास्पद : मुख्यमंत्री
साखळी पालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी उचललेली ठोस पावले, कचरा संकलनाची उत्तम व्यवस्था, कचरा वर्गीकरण, तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे यासारखे उपक्रमामुळे राज्यस्तरीय गौरवास सांखळी शहर प्राप्त ठरले. या यशाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या खंबीर नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले. ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वीरित्या राबविल्याने साखळी पालिकेने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
हा गौरव प्रत्येक गोमंतकीयांचा : रोहित मोन्सेरात
पणजी महानगरपालिकेमार्फत गेल्या काही वर्षांत स्वच्छतेच्याबाबतीत अनेक उपक्रम राबविण्यात आले. कचरा संकलन व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापनात वैज्ञानिक प्रक्रिया, घन आणि ओला कचरा वेगवेगळा संकलन व प्रक्रिया, स्वच्छता दूत, स्वयंसंस्था व नागरिकांचा सक्रीय सहभाग यामुळे पणजी शहर दिवसेंदिवस स्वच्छ होत चालले आहे. सर्वांच्या सामूहिक जबाबदारी आणि जागृतीमुळे पणजी शहराने राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. पणजी महापालिका आणि साखळी पालिका यांचा गौरव म्हणजे प्रत्येक गोमंतकीयांचा हा गौरव आहे, अशा शब्दांत महापौर रोहित मोन्सेरात यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर आपले मत व्यक्त केले.