अमेरिकेच्या अॅटर्नी जनरल होणार पॅम बोडी
ट्रम्प यांच्याकडून गेट्ज यांच्यास्थानी निवड
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च्या नव्या प्रशासनासाठी पॅम बोंडी यांना अॅटर्नी जनरल पदासाठी निवडले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावाची घोषणा करत ट्रम्प यांनी बोंडी यांना वकिलीचा सुमारे 20 वर्षांचा अनुभव असून त्या हिंसक गुन्हेगारांबद्दल अत्यंत कठोर असल्याचे उद्गार काढले आहेत.
यापूर्वी ट्रम्प यांनी मॅट गेट्ज यांना अॅटर्नी जनरल करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेच्या 8 दिवसांनी लैंगिक शोषणांच्या आरोपांमुळे ट्रम्प कॅबिनेटमधून स्वत:चे नाव मागे घेतले होते. माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे ट्रम्प यांचे कामकाज प्रभावित होऊ शकते असे म्हणत गेट्ज यांनी स्वत:ची माघार जाहीर केली होती.
गेट्ज यांना अॅटर्नी जनरल करण्यात येणार असल्याचे घोषणेनंतर डेमोक्रेटिक पार्टीचे नेते यावर प्रश्न उपस्थित करत होते. गेट्ज यांच्यावरील लैंगिक शोषणांच्या आरोपांची चौकशी हाउस ऑफ एथिक्स कमिटी करत आहे. मी 17 वर्षांची असताना गेट्ज यांनी दोनवेळा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते असा आरोप एका महिलेने केला आहे. गेट्ज यांच्यावर आणखी गंभीर आरोप असल्याचे महिलांशी निगडित मुद्द्यांवर काम करणाऱ्या वकील जोएल लेपर्ड यांनी एथिक्स कमिटीसमोर सांगितले होते.
याप्रकरणी वाद वाढल्यावर गेट्ज यांनी अॅटर्नी जनरल पदावरून मागे हटणार असल्याची घोषणा केली होती. मागील आठवड्यात अॅटर्नी जनरल पदासाठी नाव जाहीर झाल्यावर गेट्ज यांनी हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. गेट्ज हे 2017 पासून प्रतिनिधिगृहाचे सदस्य होते. 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला होता. परंतु ते आता पुन्हा सभागृहात जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.