बेळगाव-लातूर मार्गावर पालखी बस सुसाट
अत्याधुनिक सुविधांसह आजपासून आंतरराज्य मार्गावर धावणार
बेळगाव : बेळगाव-लातूर आंतरराज्य मार्गावर अत्याधुनिक सुविधांसह नवीन पालखी बस शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे बेळगाव-लातूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: आरामदायी पालखी नॉन एसी बस धावणार आहे. त्यामुळे प्रवास सुखकर होणार आहे. परिवहन मंडळाकडून अत्याधुनिक बससेवा उपलब्ध करून प्रवाशांची गैरसोय दूर केली जात आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून बेळगाव-लातूर (महाराष्ट्र) ही आंतरराज्य बससेवा सुरू होणार आहे. या बसचा तिकीट दर 900 रुपये इतका आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून ही बस दररोज रात्री 8 वाजता सुटून जमखंडी, विजापूर, सोलापूर, तुळजापूरमार्गे दुसऱ्या दिवशी पहाटे 6.20 वाजता लातूरमध्ये पोहोचणार आहे. लातूर येथून सायंकाळी 7.30 वाजता सुटून तुळजापूर, सोलापूर, विजापूर, जमखंडीमार्गे पहाटे 5.30 वाजता बेळगावात पोहोचणार आहे. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून ही आरामदायी बससेवा सुरू होत असल्याने बेळगाव-लातूर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. या आरामदायी बससेवेमुळे बेळगाव-लातूर प्रवास करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. पूर्वी खासगी बसने प्रवास करावा लागत होता. मात्र, परिवहनने या मार्गावर ही अत्याधुनिक सुविधांसह बससेवा सुरू केल्याने रात्रीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
तिकीट सेवा
प्रवाशांच्या सोयीखातर ऑनलाईन तिकीट उपलब्ध करण्यात आले आहे. प्रवाशांना www.ksrtc.in, www.nwkrtc.in या वेबसाईटवर तिकीट बुकींग करता येणार आहे. प्रवाशांना घरबसल्या मोबाईलवरूनही तिकीट आरक्षित करता येणार आहे. याचबरोबर बस स्थानकात आगाऊ तिकीट आरक्षणासाठी काऊंटर उपलब्ध केले आहे.
आंतरराज्य बससेवा आजपासून
बेळगाव-लातूर ही आंतरराज्य बससेवा शुक्रवारपासून सुरू होत आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा. प्रवाशांना घरबसल्या तिकीट बुकींग करता येणार आहे. अत्याधुनिक सुविधांसह ही नवीन पालखी बस सुरू होत आहे.
हुबळी-शिर्डी मार्गावर पालखी बस
हुबळी-शिर्डी नवीन आरामदायी पालखी बससेवा सुरू झाली आहे, अशी माहिती वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाने दिली आहे. त्यामुळे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर झाली आहे. वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध मार्गांवर पालखी बससेवा सुरू केली जात आहे. हुबळी आगारात दाखल झालेल्या चार पालखी बसपैकी दोन बस हुबळी ग्रामीण सेवेत दाखल झाल्या आहेत. तर एक बस हुबळी-शिर्डी मार्गावर धावू लागली आहे. हुबळी बस स्थानकातून रात्री 8 वाजता ही विशेष बस शिर्डीकडे जाते. धारवाड, बेळगाव, पुणे, अहमदनगरमार्गे सकाळी 8.45 वाजता शिर्डीत पोहोचते. दुसरी बस शिर्डीहून रात्री 8 वाजता सुटते. बेळगाव, धारवाडमार्गे सकाळी 7.55 वाजता हुबळी बस स्थानकात पोहोचते. यासाठी 1280 रुपये तिकीट शुल्क निश्चित करण्यात आले आहे. विशेषत: एकाच तिकिटावर चार किंवा त्याहून अधिक बूक केल्यास तिकीट दरात 5 टक्के सवलत दिली जात आहे. शिवाय जायचे आणि यायचे तिकीट एकाच वेळी आरक्षित केल्यास तिकीट दरात 10 टक्के सवलत दिली जाते.
शिर्डी येथील साईबाबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. यासाठी हुबळी बस स्थानकातून विशेष पालखी बस सोडण्यात आली आहे. अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुखकर होऊ लागला आहे.
- के. के. लमाणी-डीटीओ