डगमगत्या पाकिस्तानची आज ऑस्ट्रेलियासमोर कसोटी
वृत्तसंस्था/ कोलंबो
ऑस्ट्रेलियाची सुऊवात जवळजवळ निर्दोष राहिलेली असल्याने आणि त्यांची ताकद पाहता आज बुधवारी येथे होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील तेव्हा स्वाभाविकपणे ऑस्ट्रेलियाचे पारडे प्रचंड जड असेल.
या जागतिक स्पर्धेत इतर संघांच्या कामगिरीपेक्षा ऑस्ट्रेलियाचा उत्कृष्ट फॉर्म वेगळा आहे. अॅलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील संघ आतापर्यंत 300 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव संघ आहे. मागील दोन सामन्यांमध्ये बांगलादेश आणि भारताविऊद्ध बेफिकीर दिसलेल्या कमकुवत पाकिस्तान संघाविऊद्ध आणखी एक मोठी धावसंख्या त्यांना उभारता येईल. ट्रान्स-टास्मानियन प्रतिस्पर्धी न्यूझीलंडविरुद्ध 300 पेक्षा जास्त धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी मिळविलेल्या मोठ्या विजयाने हे दाखवून दिले की, ते त्यांचे आठवे विश्वचषक विजेतेपद मिळविण्याच्या दृष्टीने किती उत्साही आहेत.
जरी सलामीवीर अॅलिसा हिली, बेथ मुनी आणि अॅनाबेल सदरलँड यांच्यासारख्या फलंदाज अपयशी ठरल्या असल्या, तरी इंदूरमध्ये न्यूझीलंडविऊद्ध अॅश्ले गार्डनरने सामना जिंकून देणारी शतकी खेळी साकारली आणि अखेर सामना एकतर्फी झाला. अॅनाबेल सदरलँडची वेगवान गोलंदाजी आणि सोफी मोलिनेक्सच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्या संघांना आव्हान देण्यापूर्वी पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यात आपली रणनीती अधिक सुव्यवस्थित करेल.
भारताविऊद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने ऑस्ट्रेलियाला उपखंडातील खेळपट्ट्यांवर चांगली तयारी करण्याच्या दृष्टीने मदत केलेली आहे. दुसरीकडे, बांगलादेश आणि भारताकडून पराभव पत्करलेला आणि सध्या आठ संघांच्या स्पर्धेत शेवटच्या स्थानावर असलेला पाकिस्तान त्यांना येथे त्रास होईल अशी शक्यता कमी आहे. शनिवारी येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवरील ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेविऊद्धचा सामना रद्द झाल्याने त्यांची निराशा झालेली असेल. कारण त्यामुळे दोन गुण मिळवण्याची आणि क्रमवारीत अव्वल स्थानावर जाण्याची संधी हिरावून घेतली गेली.
तथापि, विश्रांती मिळालेला आणि ताजातवाना झालेला ऑस्ट्रेलिया संघ फातिमा सनाच्या पाकिस्तानवर मोठा विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेश (7 गड्यांनी पराभूत) आणि भारत (88 धावांनी पराभूत) यांच्याविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्यांच्यात एकसंधता नव्हती आणि संघ खेळाच्या सर्व विभागांमध्ये कमी पडला. फलंदाजीत खोलीचा अभाव आणि मधल्या फळीतील दर्जेदार फलंदाजांच्या अनुपस्थितीमुळे पाकिस्तानला स्पर्धेत आतापर्यंत दोन वेळा 100 पेक्षा जास्त धावाच तेवढ्या करता आल्या आहेत आणि सिद्रा अमीन, फातिमा सना आणि मुनीबा अलीसारख्या त्यांच्याकडील दिग्गजांना संघर्ष करावा लागला आहे. कर्णधार सना आणि डायना बेगच्या नेतृत्वाखालील त्यांच्या गोलंदाजीला बांगलादेशविऊद्ध टप्पा आणि दिशेच्या बाबतीत संघर्ष करावा लागला. त्यातून त्यांनी अतिरिक्त 18 धावा दिल्या. मात्र त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी भारताविऊद्ध सुधारित कामगिरी केली, ज्यामध्ये बेगने चार बळी घेतले.
तथापि, सिद्रा अमीनच्या अर्धशतकानंतरही फलंदाजांनी अपेक्षेपेक्षा खूपच खराब कामगिरी केल्याने सलग दुसऱ्या सामन्यात त्यांनी पराभव पत्करला. प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही विश्वचषक सामने खेळल्याने परिस्थितीची पाकिस्तानला असलेली माहिती ऑस्ट्रेलियाचा समतोल आणि अनुभव पाहता फारशी महत्त्वाची ठरणार नाही.
वेळ : दुपारी 3 वा.