वनडे मालिकेत पाकची विजयी सलामी
द. आफ्रिकेचा 2 गड्यांनी पराभव, सलमान आगा ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / फैसलाबाद
‘सामनावीर’ सलमान आगा आणि मोहम्मद रिझवान यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान पाकिस्तानने द. आफ्रिकेचा 2 चेंडू बाकी ठेवून 2 गड्यांनी पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सलामी दिली. या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेचा डाव 49.1 षटकात 263 धावांत आटोपला. त्यानंतर पाकने 49.4 षटकात 8 बाद 264 धावा जमवित विजयाची नोंद केली.
द. आफ्रिकेच्या डावात प्रेटोरियस आणि डिकॉक यांनी शानदार अर्धशतके झळकविताना सलामीच्या गड्यासाठी 98 धावांची भागिदारी केली. प्रेटोरियसने 60 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 57 तर डिकॉकने 2 षटकार आणि 6 चौकारांसह 63 धावा जमविल्या. कर्णधार ब्रिझेकीने 54 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 42, क्विसेलीने 3 चौकारांसह 22, बॉश्चने 40 चेंडूत 6 चौकारांसह 41, झोर्झीने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 18 धावा जमविल्या. पाकतर्फे नसीम शाह आणि अब्रार अहमद यांनी प्रत्येकी 3 तसेच सईम आयुबने 39 धावांत 2, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावात फक्र झमान आणि सईम आयुब यांनी सलामीच्या गड्यासाठी 87 धावांची भागिदारी केली. आयुबने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 39 तर फक्र झमानने 57 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 45 धावा जमविल्या. बाबर आझम केवळ 7 धावांवर बाद झाला. मोहम्मद रिझवान आणि सलमान आगा यांनी पाकचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 91 धावांची भागिदारी केली. रिझवानने 74 चेंडूत 6 चौकारांसह 55 तर सलमान आगाने 71 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 62 धावा झोडपल्या. रिझवान बाद झाल्यानंतर सलमान आगा आणि हुसेन तलत यांनी पाचव्या गड्यासाठी 45 धावांची भर घातली. सलमान आगा 48 व्या षटकात बाद झाला त्यावेळी पाकला विजयासाठी 11 धावांची जरुरी होती. मोहम्मद नवाज केवळ 9 धावांवर बाद झाला. शेवटी शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. 49.4 षटकात पाकने 8 बाद 264 धावा जमवित विजयासह मालिकेत आघाडी मिळविली. द. आफ्रिकेतर्फे एन्गिडी, फरेरा, बॉश्च यांनी प्रत्येकी 2 तर लिंडे आणि फॉर्चुन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. या मालिकेतील दुसरा सामना फैसलाबादच्या इक्बाल स्टेडियमवर गुरूवारी खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका 49.1 षटकात सर्वबाद 263 (डिकॉक 63, प्रेटोरियस 57, ब्रिझेकी 42, झोर्जी 18, बॉश्च 41, क्विसेली 22, अवांतर 14, नसीम शाह व अब्रार अहमद प्रत्येकी 3 बळी, सईम आयुब 2-39, शाहीफ आफ्रिदी, मोहम्मद नवाज प्रत्येकी 1 बळी), पाक 49.4 षटकात 8 बाद 264 (सलमान आगा 62, रिझवान 55, फक्र झमान 45, सईम आयुब 39, हुसेन तलत 22, अवांतर 20, एन्गिडी, फरेरा, बॉश्च प्रत्येकी 2 बळी, लिंडे व फॉर्चुन प्रत्येकी 1 बळी).