पाकचा मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग
तिरंगी मालिका : द.आफ्रिकेवर 6 गड्यांनी मात करून अंतिम फेरीत, सामनावीर सलमान, रिझवान यांची विक्रमी भागीदारीसह शतके
वृत्तसंस्था/कराची
तिरंगी मालिकेतील येथे झालेल्या हाय स्कोअरिंग वनडे सामन्यात यजमान पाकिस्तानने कर्णधार मोहम्मद रिझवान व सामनावीर उपकर्णधार सलमान आगा यांच्या शानदार शतकांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा सहा चेंडू बाकी ठेवत 6 गड्यांनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळविले. पाकचा हा आजवरचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता. रिझवानने 128 चेंडूत नाबाद 122 तर सलमानने पहिले वनडे शतक नोंदवताना 103 चेंडूत 134 धावा फटकावल्या. द.आफ्रिकेने 50 षटकांत 5 बाद 352 धावा जमविल्यानंतर पाकने 49 षटकांत 4 बाद 355 धावा जमविल्या. शनिवारी पाक व न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत होईल. यापूर्वी 2022 मध्ये लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकने 349 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तो विक्रम त्यांनी येथे मागे टाकला. द.आफ्रिकेने 352 धावा जमवित या नूतनीकरण झालेल्या नॅशनल बँक स्टेडियमवरील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. हेन्रिच क्लासेन (87), मॅथ्यू ब्रीत्झ्के (83), कर्णधार टेम्बा बवुमा (82) यांनी शानदार फलंदाजी केली. पण त्यांना शतकी मजल मारता आली नाही. तीन दिवसांत दुसऱ्यांदा त्यांना तीनशेहून अधिक धावा जमवल्यानंतरही पराभव पत्करावा लागला. सोमवारी त्यांना न्यूझीलंडविरुद्ध 304 धावांचे संरक्षण करता आले नव्हते.
संक्षिप्त धावफलक
द.आफ्रिका 50 षटकांत 5 बाद 352 : बवुमा 96 चेंडूत 82, झॉर्झी 18 चेंडूत 22, ब्रीत्झ्के 84 चेंडूत 83, क्लासेन 56 चेंडूत 11 चौकार, 3 षटकारांसह 87, मुल्डेर 2, व्हेरेन 32 चेंडूत नाबाद 44, बॉश 9 चेंडूत नाबाद 9, अवांतर 17. शाहीन शाह आफ्रिदी 2-66, नसीम शाह 1-68, खुशदिल शाह 1-39.
पाकिस्तान 49 षटकांत 4 बाद 355 : फखर झमान 28 चेंडूत 41, बाबर आझम 19 चेंडूत 23, सौद शकील 15, रिझवान 128 चेंडूत 9 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 122, सलमान आगा 103 चेंडूत 16 चौकार, 2 षटकारांसह 134, ताहिर नाबाद 4, अवांतर 16. मुल्डेर 2-79, बॉश 1-70, एन्गिडी 1-74.