For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकचा मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग

10:25 AM Feb 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकचा मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग
Advertisement

तिरंगी मालिका : द.आफ्रिकेवर 6 गड्यांनी मात करून अंतिम फेरीत, सामनावीर सलमान, रिझवान यांची विक्रमी भागीदारीसह शतके

Advertisement

वृत्तसंस्था/कराची

तिरंगी मालिकेतील येथे झालेल्या हाय स्कोअरिंग वनडे सामन्यात यजमान पाकिस्तानने कर्णधार मोहम्मद रिझवान व सामनावीर उपकर्णधार सलमान आगा यांच्या शानदार शतकांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा सहा चेंडू बाकी ठेवत 6 गड्यांनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळविले. पाकचा हा आजवरचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता. रिझवानने 128 चेंडूत नाबाद 122 तर सलमानने पहिले वनडे शतक नोंदवताना 103 चेंडूत 134 धावा फटकावल्या. द.आफ्रिकेने 50 षटकांत 5 बाद 352 धावा जमविल्यानंतर पाकने 49 षटकांत 4 बाद 355 धावा जमविल्या. शनिवारी पाक व न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत होईल. यापूर्वी 2022 मध्ये लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकने 349 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तो विक्रम त्यांनी येथे मागे टाकला. द.आफ्रिकेने 352 धावा जमवित या नूतनीकरण झालेल्या नॅशनल बँक स्टेडियमवरील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. हेन्रिच क्लासेन (87), मॅथ्यू ब्रीत्झ्के (83), कर्णधार टेम्बा बवुमा (82) यांनी शानदार फलंदाजी केली. पण त्यांना शतकी मजल मारता आली नाही. तीन दिवसांत दुसऱ्यांदा त्यांना तीनशेहून अधिक धावा जमवल्यानंतरही पराभव पत्करावा लागला. सोमवारी त्यांना न्यूझीलंडविरुद्ध 304 धावांचे संरक्षण करता आले नव्हते.

Advertisement

रिझवान व सलमान यांनी पाटा खेळपट्टीवर द.आफ्रिकेची वेगवान गोलंदाज  लुंगी एन्गिडी (1-74), कॉर्बिन बॉश (1-70), विआन मुल्डेर (2-79) यांची गोलंदाजी चोपून काढली. त्यांनी चौथ्या गड्यासाठी 260 धावांची पाकतर्फे विक्रमी भागीदारी केली. मुल्डेरने पहिल्या स्पेलमध्ये दोन बळी मिळविले असले तरी पाकने पहिल्या 10 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 90 धावा झोडपल्या. गेल्या 20 वर्षात पहिल्यांदात पाकतर्फे पॉवरप्लेमध्ये इतक्या धावा जमविल्या आहेत. फखर झमानने 28 चेंडूत 41 तर बाबर आझमने 19 चेंडूत 23 धावा जमवित पाकला 37 चेंडूत 57 धावांची सलामी दिली होती. रिझवान व सलमान यांनी तबरेझ शम्सी व केशव महाराज यांचा फिरकी मारा मात्र काळजीपूर्वक खेळून काढला. रिझवानने 106 चेंडूत मुल्डेरला उत्तुंग षटकार ठोकत शतक पूर्ण केले. तीन चेंडूनंतर सलमाननेही एकेरी धाव घेत पहिले वनडे शतक पूर्ण केले. विजयासाठी दोन धावांची गरज असताना तो बाद झाला. तय्यब ताहिर पहिल्याच चेंडूवर चौकार ठेवत विजय साकार केला. द.आप्रेकेच्या टोनी झॉर्झीने 18 चेंडूत 22, काईल व्हेरेनने 32 चेंडूत नाबाद 44, बॉशने 9 चेंडूत नाबाद 14 धावा जमविल्या. त्यांना 17 अवांतर धावा मिळाल्या. क्लासेनच्या आक्रमक खेळीमुळेच द.आफ्रिकेला शेवटच्या 10 षटकांत 110 धावा फटकावता आल्या. पाकतर्फे शाहीन शाह आफ्रिदीने 2, नसीम शाह व खुशदिल शाह यांनी एकेक बळी टिपला.

संक्षिप्त धावफलक

द.आफ्रिका 50 षटकांत 5 बाद 352 : बवुमा 96 चेंडूत 82, झॉर्झी 18 चेंडूत 22, ब्रीत्झ्के 84 चेंडूत 83, क्लासेन 56 चेंडूत 11 चौकार, 3 षटकारांसह 87, मुल्डेर 2, व्हेरेन 32 चेंडूत नाबाद 44, बॉश 9 चेंडूत नाबाद 9, अवांतर 17. शाहीन शाह आफ्रिदी 2-66, नसीम शाह 1-68, खुशदिल शाह 1-39.

पाकिस्तान 49 षटकांत 4 बाद 355 : फखर झमान 28 चेंडूत 41, बाबर आझम 19 चेंडूत 23, सौद शकील 15, रिझवान 128 चेंडूत 9 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 122, सलमान आगा 103 चेंडूत 16 चौकार, 2 षटकारांसह 134, ताहिर नाबाद 4, अवांतर 16. मुल्डेर 2-79, बॉश 1-70, एन्गिडी 1-74.

Advertisement
Tags :

.