तिसऱ्या कसोटीत पाकची स्थिती मजबूत
सौद शकीलचे शतक, मोहम्मद रिझवानचा नवा विक्रम, इंग्लंड 53 धावांनी पिछाडीवर
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीवर यजमान पाकने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. पाकचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा टप्पा गाठणारा यष्टिरक्षक-फलंदाज बनला आहे.
या शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 267 धावांवर आटोपल्यानंतर पाकने 3 बाद 73 या धावसंख्येवरुन शुक्रवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पाकच्या डावामध्ये सौद शकीलने 223 चेंडूत 5 चौकारांसह 134 धावा झळकविल्या. नौमन अलीने 84 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 45 तर साजीद खानने 48 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 48 धावा झोडपल्या. मोहम्मद रिझवानने 46 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 25, कर्णधार शान मसुदने 26, सईम आयुबने 1 चौकारासह 19 तर अब्दुल्ला शफीकने 1 चौकारांसह 14 धावा केल्या. सौद शकीलने 92 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक तर 181 चेंडूत 4 चौकारांसह शतक पूर्ण केले. उपाहारावेळी पाकची स्थिती 7 बाद 157 अशी होती. खेळाच्या पहिल्या सत्रात पाकने 4 गडी 84 धावांत गमविले होते.
पाकच्या तळाच्या फलंदाजांनी समयोचित फलंदाजी केल्याने पाकला 344 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकची एकवेळ स्थिती 7 बाद 177 अशी होती. त्यानंतर नौमन अली आणि सौद शकील यांनी आठव्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केली. नौमन अली बाद झाल्यानंतर सौद शकीलला साजिद खानने चांगली साथ देताना नवव्या गड्यासाठी 72 धावांची भागिदारी केली. चहापानावेळी पाकने 8 बाद 267 धावांपर्यंत मजल मारली होती. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये पाकचा पहिला डाव 96.4 षटकात 344 धावांवर आटोपला. इंग्लंडतर्फे रेहान अहमदने 66 धावांत 4, शोएब बशीरने 129 धावांत 3, अॅटकिन्सनने 22 धावांत 2 तर लिचने 1 गडी बाद केला. पाकने इंग्लंडवर 77 धावांची आघाडी मिळविली.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 9 षटकात 3 बाद 24 धावा जमविल्या. पाकच्या नौमन अली आणि साजीद खान यांनी इंग्लंडचे 3 फलंदाज झटपट बाद केले. साजीद खानने पाचव्या षटकात डकेटला 12 धावांवर पायचित केले. त्यानंतर नौमन अलीने क्रॉलेला 2 धावांवर पायचित केले. नौमन अलीने इंग्लंडला आणखीन एक धक्का देताना पोपला सलमानकरवी झेलबाद केले. त्याने एक धाव जमविली. रुट 5 तर ब्रुक 3 धावांवर खेळत आहेत. पाकतर्फे नौमन अलीने 2 तर साजीद खानने 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या पहिल्या डावात साजीद खानने 6 तर नौमन अलीने 3 गडी बाद केले होते. इंग्लंडचा संघ अद्याप 53 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड प. डाव 68.2 षटकात सर्वबाद 267, पाक. प. डाव 96.4 षटकात सर्व बाद 344 (सौद शकील 134, नौमन अली 45, साजीद खान नाबाद 48, शान मसुद 26, मोहम्मद रिझवान 25, सईम आयुब 19, शफीक 14, अवांतर 15, रेहान अहमद 4-66, शोएब बशीर 3-29, अॅटकिन्सन 2-22, लिच 1-105), इंग्लंड दु. डाव 9 षटकात 3 बाद 24 (क्रॉले 2, डकेट 12, पोप 1, रुट खेळत आहे 5, ब्रुक खेळत आहे 3, नौमन अली 2-9, साजीद खान 1-14)
मोहम्मद रिझवानचा विक्रम
पाकचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मोहम्मद रिझवानने कसोटी क्रिकेटमध्ये जलद 2000 धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम करताना माजी कर्णधार व यष्टिरक्षक-फलंदाज सर्फराज अहमदचा विक्रम मोडीत काढला.
मोहम्मद रिझवानने 57 डावांत 2 हजार धावांचा टप्पा ओलांडला तर माजी कर्णधार सर्फराज अहमदने 59 डावांत हा पराक्रम केला होता. सध्या इंग्लंड बरोबर सुरू असलेल्या कसोटी मालिकेत 32 वर्षीय मोहम्मद रिझवान फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी रिझवानला 2 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 16 धावांची जरुरी होती. मात्र पाकच्या पहिल्या डावात 25 धावा जमवित त्याने हा टप्पा पार केला. मोहम्मद रिझवानने कसोटी क्रिकेटमधील यापूर्वीचे आपले शेवटचे शतक बांगलादेश बरोबरच्या पहिल्या कसोटीत नोंदविले होते. त्याने रावळपिंडीच्या त्या कसोटीत पहिल्या डावात नाबाद 171 तर दुसऱ्या डावात 51 धावा जमविल्या होत्या. पण अलिकडच्या शेवटच्या चार कसोटीत त्याला अर्धशतक नोंदविता आलेले नाही.