पाकिस्तानचा वनडे मालिकेत व्हाईटवॉश
तिसऱ्या सामन्यातही पाकिस्तान 43 धावांनी पराभूत : ब्रेसवेल सामनावीर तर सीअर्स मालिकावीर
वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धची वनडे मालिका क्लीन स्वीप केली आहे. किवी संघाने पाकिस्तानविरुद्ध मालिकेतील तिसरा सामना 43 धावांनी जिंकला आणि मालिका 3-0 ने जिंकली. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात 42 षटकांत 8 गडी गमावल्यानंतर किवी संघाने 264 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 40 षटकांत 221 धावांवर सर्वबाद झाला. विशेष म्हणजे, टी 20 मालिकेपाठोपाठ वनडे मालिकेतही पाकला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, अर्धशतकी खेळी साकारणारा किवीज कर्णधार मायकेल ब्रेसवेल सामन्याचा मानकरी ठरला तर मालिकेत 10 बळी घेणारा बेन सीअर्स मालिकावीर ठरला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या किवी संघाची सुरुवात खराब झाली. निक केली 3 धावा करून माघारी परतला झाला. यानंतर राइस मारियु आणि हेन्री निकोल्स यांनी 78 धावांची भागीदारी रचली. हेन्री निकोल्स 31 धावा करून बाद झाला. त्रायस मारियुने 58 धावांची खेळी साकारली. यानंतर डॅरिल मिचेल व टीम सेफर्ट यांनी डावाची जबाबदरी सांभाळली. मिचेलने 43 तर सेफर्टने 26 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार ब्रेसवेलने 40 चेंडूत 1 चौकार व 6 षटकारासह 59 धावांची खेळी साकारत संघाला अडीचशेचा टप्पा पार करुन दिला. किवी संघाला 42 षटकांत 8 गडी गमावत 264 धावापर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून अकिफ जावेदने 4, नसीम शाहने 2, सुफियान माकिमने 1 आणि फहीम अश्रफने 1 गडी बाद केला.
पाकचे सपशेल लोटांगण
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पाकिस्तानचा संघ 221 धावांपर्यंतच मजल मारू शकला. इमाम दुखापतीमुळे लवकर निवृत्त झाला. त्यानंतर आलेला अब्दुल्ला शफीक आणि बाबर आझम यांच्यात 68 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान अब्दुल्लाने 33 धावांची खेळी केली. त्यानंतर उस्मान खान 12 धावा करून माघारी गेला. बाबर आझमही 50 धावा करून बाद झाला. त्यानंतर रिझवानने 37, आगा सलमानने 11 आणि तय्यब ताहिरने 33 धावा केल्या. इतर पाक फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यामुळे त्यांना 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडकडून बेन सीअर्सने 34 धावांत 5 बळी घेत पाकच्या डावाला खिंडार पाडले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 42 षटकांत 8 बाद 264 (मारियू 58, निकोल्स 31, मिचेल 43, ब्रेसवेल 59, जावेद 4 बळी, नसीम शाह 2 बळी)
पाकिस्तान 40 षटकांत सर्वबाद 221 (अब्दुल शफीक 33, बाबर आझम 50, मोहम्मद रिझवान 37, ताहिर 33, बेन सीअर्स 5 बळी, जेकब डफी 2 बळी).