For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानची मोठी हानी पुराव्यांसह उघड

06:22 AM Jun 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानची मोठी हानी पुराव्यांसह उघड
Advertisement

भारताने पाडली 6 युद्धविमाने, एक मालवाहू विमान नष्ट, प्रचंड शस्त्रसाठाही निकामी, क्षेपणास्त्रे उध्वस्त

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी निरपराध आणि नि:शस्त्र पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारुन केलेल्या निर्घृण हल्ल्याचा सूड भारताने किती मोठ्या प्रमाणात घेतला आहे, याचा पुरावाच आता जगासमोर आला आहे. पाकिस्तानच्या हानी संबंधीची वृत्ते भारताच्या ‘सिंदूर अभियाना’नंतर अनेकदा प्रसिद्ध झाली आहेतच. पण पाकिस्तानने ‘जणू काही फारसे काही घडलेच नाही’ असा आविर्भाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, तोही स्पष्ट पुराव्यांनी हाणून पाडला गेला आहे. भारताने आपल्या अचूक हल्ल्यांनी पाकिस्तानचे एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 46 तळ एकतर नष्ट केले आहेत. किंवा त्यांची मोठी मोडतोड केली आहे, हे आता उपग्रहीय छायाचित्रे आणि प्रत्यक्ष स्थानांवर जाऊन पाकिस्ताननेच केलेले निरीक्षण यांच्या माध्यमातून निर्विवादपणे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

पाकिस्तानने नुकताच यासंदर्भात एक कागदपत्रसंच (डॉसियर) आपल्या प्रशासनाकडे सोपविला आहे. हा संच गुप्त असल्याचे सांगण्यात येत असले तरी, त्याचा महत्वाचा भाग पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी उघड केला आहे. प्रथम, पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ आणि नंतर त्या देशाचे 11 वायुतळ भारताने उध्वस्त केल्याची माहिती देण्यात आली होती. तथापि, पकिस्तानच्या गुप्त अहवालाचा हवाला देऊन त्या देशाचे 42 ते 46 तळ भारताच्या माऱ्यामुळे प्रभावित झाले आहेत, अशी नवी माहिती समोर आणण्यात आली आहे.

 

6 युद्ध विमाने नष्ट

पाकिस्तानच्या वायुदलात आघाडीच्या फळीत असणारी सहा युद्धविमाने नष्ट करण्यात आली आहेत. त्यांच्यात चार एफ-16 विमानांचा समावेश आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्कराचे एक मालवाहू विमानही नष्ट झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. बहावलपूर आणि मुरिदके येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची मुख्यालये पूर्णत: धाराशायी झाली असून ती कायमची बंद करण्यात आली असल्याचे फलक त्यांच्या स्थानी आता लावण्यात आले आहेत.

भारताची योजना काय होती

प्रथमत: भारताची योजना केवळ पाकिस्तानच्या महत्वाच्या दहशतवादी तळांवर हल्ले करण्याची होती. बहावलपूर आणि मुरिदके येथील तळ ही सर्वाधिक महत्वाची लक्ष्ये राहतील, असे आधीच निर्धारित करण्यात आले होते. ऐनवेळी इतरही सात दहशतवादी स्थानांचा समावेश करण्यात आला होता, असे स्पष्ट होत आहे.

नव्हता भारतावर दबाव

चार दिवसांच्या सशस्त्र संघर्षानंतर भारतावर शस्त्रसंधी स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी चर्चा आहे. तथापि, ती निखालस खोटी असल्याचे भारताच्या सेनादल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. भारतावर कोणाचाही दबाव नव्हता. सिंदूर अभियानाची प्राधान्याने असणारी उद्दिष्ट्यो पूर्ण झाल्यामुळे पाकिस्तानकडून आलेला शस्त्रसंधी प्रस्ताव भारताने स्वत:च्या इच्छेने स्वीकारला. कोणाच्याही बाह्या दबावाचा प्रश्न नव्हता, असे प्रतिपादन करण्यात आले आहे.

हल्ल्याच्या आधीची योजना...

पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी भारताने चार विविध पर्यायी योजना सज्ज ठेवल्या होत्या. एका योजना प्रभावी ठरणार नसल्यास ऐनवेळी पर्यायी योजना समोर आणण्याचे निर्धारित करण्यात आले होते. हल्ल्याची वेळही केवळ तीन सर्वात वरीष्ठ अधिकाऱ्यांनाच माहीत होती. हल्ल्याचे दिनांक आणि वेळही शेवटपर्यंत अधांतरीच ठेवण्यात आली होती. 7 मे नंतरच्या मध्यरात्री 12.30 ते 2 यावेळेत केव्हातरी हल्ले केले जातील, अशी योजना होती. तसेच आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडायची नाही, असेही वायुदलाने हेतुपुरस्सर ठरविले होते.

अर्ली वॉर्निंग यंत्रणा नष्ट

पाकिस्तानची एवॅक्स यंत्रणा आणि या यंत्रणेशी संबंधित दोन विमाने नष्ट झाली आहेत. 10 हून अधिक विनाचालक वायुवाहनेही पाकिस्तानने गमाविली आहेत. त्याची भूमीवरील रडार यंत्रणाही मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाली आहे. एकंदर भारताने त्याच्या योजनेच्या अनुसार ‘सिंदूर’ अभियान पार पाडले असून ते अपेक्षेपेक्षाही अधिक प्रमाणात यशस्वी झाले आहे. अद्याप हे अभियान संपलेले नसून त्याचा द्वितीय भाग पाकिस्तानच्या कृतीवर अवलंबून आहे, हे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच अणुहल्ल्याची धमकी चालणार नाही, याची जाणीवही पाकिस्तान आणि त्याच्या मित्रदेशांना भारताने ठामपणे करुन दिली आहे.

पाकिस्तान वायुदल 25 टक्के खाली

ड भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे वायुदल 25 टक्के उध्वस्त झाल्याचे स्पष्ट

ड शस्त्रसंधी स्वीकारण्यासाठी भारतावर कोणाचाही दबाव नव्हता, याची स्पष्टता

ड पाकिस्तानवर हल्ल्याची योजना 23 एप्रिललाच निर्धारित, होते चार पर्याय

ड सिंदूर अभियानाची सर्व उद्देष्ट्यो पूर्ण झाल्यानंतरच स्वीकारला संधी प्रस्ताव

Advertisement
Tags :

.