पाकिस्तानच्या नौटंकीचा पर्दाफाश
युएन’मधील शरीफ यांच्या हास्यास्पद दाव्याला भारताचे रोखठोक प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या 80 व्या संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणाचा भारताने तीव्र निषेध केला. भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर ‘बेकायदेशीर नाटक’ सादर करण्याचा आणि दहशतवादाचे उदात्तीकरण करण्याचा आरोप केला. मे महिन्यात झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संघर्षात त्यांनी ‘विजय’ मिळवल्याच्या दाव्याचीही भारतीय प्रतिनिधीने शेलक्या शब्दात खिल्ली उडवली.
युएन महासभेत भारताच्या उत्तराच्या अधिकाराचा वापर करताना संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला रोखठोक प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशातील हवाई तळांचा नाश विजय म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विधानाचा ‘समाचार’ घेत गेहलोत यांनी पाकिस्तानवर दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी आणि दहशतवादाचे केंद्र म्हणून त्यांची भूमिका लपविण्यासाठी ‘बेकायदेशीर विधाने’ करत जगासमोर नौटंकी केल्याचा आरोप केला.
भारताने पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि खोटे बोलण्याचा आरोप केला आहे. ‘पाकिस्तानचे पंतप्रधान हास्यास्पद नाटक करतात. दहशतवादाला प्रोत्साहन देण्याची त्यांची सवय कायम आहे’, असे भारतीय प्रतिनिधी पेटल गेहलोत यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये स्पष्ट केले. गेहलोत यांनी मे महिन्यातील संघर्षाबद्दल शरीफ यांचे दावे फेटाळून लावले. 9 मे पर्यंत पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याची धमकी देत होता. 10 मे रोजी भारतीय सैन्याने अनेक पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली. जर जळालेले हवाई तळ हा त्यांचा ‘विजय’ असेल तर पाकिस्तानने आनंद साजरा करावा, अशी खोचक टिप्पणीही गेहलोत यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताला शत्रू म्हणतानाच पाकिस्तानने भारताविरुद्धचा संघर्ष जिंकला असून सात भारतीय विमाने पाडल्याचा खोटा दावा केला होता.
दोघांमध्ये ‘तिसरा’ नकोच!
‘भारत आणि पाकिस्तानमधील सर्व मुद्दे द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवले जातील. तिसऱ्या पक्षाची गरज नाही’, असेही गेहलोत म्हणाल्या. त्यांनी पाकिस्तानच्या शांततेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचा देश द्वेषाने बुडालेला आहे. मात्र, भारत दहशतवादाविरुद्ध कायम लढत राहणार असून कोणत्याही कुरापतींना रोखठोक प्रत्युत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही ठणकावले.
‘पाकिस्तानात होतो दहशतवाद्यांचा सन्मान’
गेहलोत यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील बहावलपूर आणि मुरीदके येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख करताना पाकिस्तानवर कुख्यात दहशतवाद्यांना श्रद्धांजली आणि सन्मान देण्याचा आरोप केला. एक चित्र हजार शब्द बोलते आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी छावण्यांमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे असंख्य चित्र आम्ही पाहिले. जेव्हा पाकिस्तानी सैन्य आणि अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहतात, तेव्हा हे राजवटीवर शंका घेणार नाही का? असा प्रश्नही गेहलोत यांनी उपस्थित केला.
सर्वप्रथम दहशतवादी छावण्या बंद करा!
भारतातील निष्पाप लोकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्ही आमच्या लोकांचे रक्षण करण्याचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचा आमचा अधिकार वापरला आहे. पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. आता पाकिस्तानने सर्व दहशतवादी छावण्या ताबडतोब बंद कराव्यात आणि सर्व दहशतवाद्यांवर नियंत्रण मिळवावे, असे गेहलोत यांनी जोर देऊन सांगितले. तसेच भारत ‘अण्वस्त्र ब्लॅकमेल’ला बळी न पडता दहशतवादी आणि त्यांचे प्रायोजक दोघांनाही जबाबदार धरेल, असेही स्पष्ट केले