पाकिस्तानची पहिली लढत आज अमेरिकेशी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
मागील टी-20 विश्वचषकातील उपविजेता पाकिस्तान आज गुरुवारच्या दुसऱ्या सामन्यात सहयजमान अमेरिकेशी भिडणार आहे. कागदावर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचे पारडे पूर्णपणे भारी दिसत असले, तरी पाकिस्तानचा अलीकडील फॉर्म पाहता ही लढत त्यांना तितकी सोपी जाणार नाही.
पाकिस्तानला आयर्लंडमध्ये टी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये 0-2 असा पराभव पत्करावा लागला. हा जागतिक स्पर्धेपूर्वीचा आदर्श निकाल नाही. त्याआधी त्यांना घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यात सदर न्यूझीलंड संघात विश्वचषक संघातील अनेक सदस्य नव्हते. कर्णधारपदातील बदल, आघाडीच्या फळीतील फेरबदल आणि निवृत्तीतून बाहेर पडलेल्या खेळाडूंमुळे पाकिस्तानची तयारी गोंधळपूर्ण राहिलेली आहे.
शाहीन आफ्रिदीकडे थोड्या काळासाठी टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवल्यानंतर बाबरला पुन्हा कर्णधारपद देण्यात आले आहे. त्या वेगवान गोलंदाजाला नंतर उपकर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती, पण त्याने ती घेण्यास नकार दिला. बाबर आणि मोहम्मद रिझवान हे पाकिस्तानचे सर्वांत सातत्यपूर्ण टी-20 परफॉर्मर आहेत. परंतु त्यांचा स्ट्राइक रेट चिंतेचा विषय आहे. त्यांचा भर वेगवान गोलंदाजीवर राहणार असून त्यात शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि निवृत्ती मागे घेऊन आलेला मोहम्मद आमीर यांचा समावेश आहे. दुसरीकडे, कॅनडाविऊद्धच्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सात गड्यांनी विजय मिळवल्यानंतर अमेरिकेचा आत्मविश्वास उंचावला आहे.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार रात्री 9 वा.