पाकचा पहिला डाव 211 धावांत समाप्त
पॅटरसन-बॉश यांची भेदक गोलंदाजी, कामरान गुलामचे अर्धशतक, द.आफ्रिका 3 बाद 82
वृत्तसंस्था / सेंच्युरियन (द. आफ्रिका)
गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत डेन पॅटरसन आणि कॉर्बिन बॉश यांच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकचा पहिला डाव 211 धावांत आटोपला. पाक संघातील कामरान गुलामने अर्धशतक झळकविले. दिवसअखेर द. आफ्रिकेने पहिल्या डावात 3 बाद 82 धावा जमविल्या आहेत.
या कसोटीमध्ये द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा द. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उठविला. पाकची एकवेळ स्थिती 4 बाद 56 अशी केविलवाणी होती. त्यानंतर कामरान गुलाम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाचव्या गड्यासाठी 81 धावांची भागिदारी केल्याने पाकला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. कामरान गुलामने 71 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 54 धावा जमविल्या. रिझवानने 62 चेंडूत 2 चौकारांसह 27 धावा केल्या. अमीर जमालने 27 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 28 तर सलमान आगाने 2 चौकारांसह 18, खुर्रम शहजादने 2 चौकारांसह 11 आणि मोहम्मद अब्बासने 1 चौकारांसह 10 धावा केल्या. तत्पूर्वी पाक संघाचा कर्णधार शान मसुदने 2 चौकारांसह 17 धावा आणि सईम आयुबने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. बाबर आझम केवळ 4 धावांवर बाद झाला.
उपाहारावेळी पाकची स्थिती 24 षटकात 4 बाद 88 अशी होती. कमरान गुलाम आणि रिझवान यांनी अर्धशतकी भागिदारी 57 चेंडूत पूर्ण केली. गुलामने आपले अर्धशतक 52 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने झळकविले. खेळाच्या दुसऱ्या सत्रात कामरान गुलाम, मोहम्मद रिझवान, अमिर जमाल आणि सलमान आगा तसेच खुर्रम शहजाद हे पाच फलंदाज चहापानापूर्वी तंबूत परतले. चहापानावेळी पाकने 57 षटकात 9 बाद 209 धावा जमविल्या होत्या. चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात जानसेनने शहजादला बाद करुन पाकचा पहिला डाव 211 धावांवर रोखला. द. आफ्रिकेतर्फे पॅटरसनने 61 धावांत 5 तर बॉशने 63 धावांत 4 आणि जानसेनने 43 धावांत 1 गडी बाद केला.
द. आफ्रिकेच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. तिसऱ्या षटकात सलामीचा झोर्जी खुर्रम शहजादच्या गोलंदाजीवर 2 धावांवर त्रिफळाचित्र झाला. त्यानंतर खुर्रम शहजादने द. आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना रिक्लेटोनला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याने 8 धावा केल्या. मोहम्मद अब्बासच्या गोलंदाजीवर स्टब्ज पायचित झाला. त्याने 9 धावा जमविल्या. एका बाजुने मारक्रेम 9 चौकारांसह 47 तर बवूमा 4 धावांवर खेळत आहे. पाकतर्फे खुर्रम शहजादने 2 तर मोहम्मद अब्बासने 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेचा संघ 129 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक: पाक. प. डाव 57.3 षटकात सर्वबाद 211 (कामरान गुलाम 54, अमीर जमाल 28, रिझवान 27, शान मसुद 17, सईम आयुब 14, शकील 14, शहजाद 11, अब्बास नाबाद 10 अवांतर 14, पॅटरसन 5-61, बॉश 4-63, जानसेन 1-43), द. आफ्रिका प. डाव 22 षटकात 3 बाद 82 (मारक्रेम खेळत आहे 47, झोर्जी 2, रिकेल्टन 8, स्टब्ज 9, बवूमा खेळत आहे 4, अवांतर 12, खुर्रम शहजाद 2-28, मोहम्मद अब्बास 1-36)
बाबर आझमचा विक्रम
पाक संघातील अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझमने क्रिकेटच्या सर्व म्हणजे तिन्ही प्रकारात 4 हजारांपेक्षा अधिक धावा जमविण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा तो तिसरा फलंदाज आहे. बाबर आझमने कसोटी क्रिकेटममध्ये 56 सामन्यात 43.49 धावांच्या सरासरीने 4001 धावा जमविल्या असून त्यामध्ये 9 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 30 वर्षीय बाबर आझमने वनडे क्रिकेटमध्ये 123 सामन्यात 56.73 धावांच्या सरासरीने 5957 धावा जमविताना 19 शतके आणि 34 अर्धशतके नोंदविली आहेत. टी-20 प्रकारात त्याने 128 सामन्यात 39.84 धावांच्या सरासरीने 4223 धावा जमविल्या असून त्यामध्ये 3 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. यापूर्वी असा पराक्रम भारताच्या विराट कोहली आणि रोहीत शर्माने केला आहे.
बॉशचा विक्रम
पाक विरुद्धच्या पहिल्या कसोटीत द. आफ्रिका संघात कसोटी पदार्पण करणाऱ्या कॉर्बिन बॉश्चने पहिल्याच चेंडूवर बळी मिळविण्याचा पराक्रम केला आहे. त्याने या कसोटीत पाकचा कर्णधार शान मसुदला 17 धावांवर जानसेनकरवी झेलबाद केले. पाकच्या डावात 15 व्या षटकात द. आफ्रिकेच्या कर्णधाराने बॉश्चकडे चेंडू सोपविला. बॉशने या षटकातील पहिल्याच चेंडूवर शान मसुदला बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर बळी मिळविणारा बॉश हा तिसरा गोलंदाज आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज शमार जोसेफने कसोटी पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर अॅडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला बाद केले होते. तर गेल्या फेब्रुवारीमध्ये द. आफ्रिकेच्या मोर्कीने न्यूझीलंडच्या कॉनव्हेला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. पाक विरुद्धच्या कसोटीत बॉश्चकडून पॅटर्सनला चांगली साथ लाभली.