पाकिस्तानचे इंग्लंडला विजयासाठी 297 धावांचे आव्हान
दुसरी कसोटी, तिसरा दिवस : अद्याप 261 धावांची जरूरी, साजीद खानचे 7 बळी, पाक दु. डाव 221, सलमान आगाचे अर्धशतक, बशिरचे 4 बळी
वृत्तसंस्था/मुल्तान
दुसऱ्या क्रिकेट कसोटीतील गुरुवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर पाकने इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 297 धावांचे आव्हान दिल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 बाद 36 धावा जमविल्या. या सामन्यातील खेळाचे दोन दिवस बाकी असून इंग्लंडला विजयासाठी आणखी 261 धावांची जरुरी आहे तर पाकला मालिकाबरोबरीत राखण्यासाठी इंग्लंडचे 8 गडी बाद करावे लागतील. दोन सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून आघाडी घेतली आहे.
या दुसऱ्या कसोटीत पाकने पहिल्या डावात 366 धावा जमविल्यानंतर इंग्लंडने 6 बाद 239 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे चार गडी 52 धावांची भार घालत तंबूत परतले. इंग्लंडच्या पहिल्या डावात डकेटने 16 चौकारांसह 114, रुटने 2 चौकारांसह 34, क्रॉलेने 3 चौकारांसह 27, पोपने 4 चौकारांसह 29, जेमी स्मिथने 2 चौकारांसह 21 आणि लिचने 3 चौकारांसह नाबाद 25 धावा जमविल्या. पाकतर्फे साजीद खान आणि नौमन अली सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. साजीद खानने 111 धावांत 7 तर नौमन अलीने 101 धावांत 3 गडी बाद केले. पाकने पहिल्या डावात इंग्लंडवर 75 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली आहे.
पाकने दुसऱ्या डावात 59.2 षटकात सर्वबाद 221 धावा जमवित इंग्लंडला विजयासाठी 297 धावांचे उद्दिष्ट दिले. पाकच्या दुसऱ्या डावात सलमान आगाने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 63, सौद शकीलने 2 चौकारांसह 31, कमरान गुलामने 5 चौकारांसह 26, साजीद खानने 1 चौकारांसह 22, सईम आयुबने 1 चौकारासह 22 धावा जमविल्या. मोहम्मद रिझवानने 2 चौकारांसह 23 धावा केल्या. इंग्लंडतर्फे शोएब बशीरने 66 धावांत 4, कार्सेने 29 धावांत 2, लीचने 67 धावांत 3 तर पॉटस्ने 19 धावांत 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. त्यांचे सलामीचे दोन फलंदाज केवळ 11 धावांत तंबूत परतले. पहिल्या डावात शतक झळकविणारा डकेट खाते उघडण्यापूर्वीच साजीद खानचा बळी ठरला. त्यानंतर नौमन अलीने क्रॉलेला 3 धावांवर झेलबाद केले.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव: सर्व बाद 366, इंग्लंड प. डाव 67.2 षटकात सर्वबाद 291 (डकेट 114, रुट 34, पोप 29, क्रॉले 27, स्मिथ 21, लीच नाबाद 25, अवांतर 12, साजीद खान 7-111, नौमन अली 3-101), पाक. दु. डाव 59.2 षटकात सर्वबाद 271 (सलमान आगा 73, कमरान गुलाम 26, सईम आयुब 22, सौद शकील 31, मोहम्मद रिझवान 23, साजीद खान 22, अवांतर 17, शोएब बशीर 4-66, लीच 3-67, कार्से 2-29, पॉटस् 1-19), इंग्लंड दु. डाव 11 षटकात 2 बाद 36 (क्रॉले 3, डकेट 0, पोप खेळत आहे 21, रुट खेळत 12, साजीद खान आणि नौमन अली प्रत्येकी 1 बळी)