क्वेटामध्ये बलोच निदर्शकांवर पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार
पाकिस्तानी सरकारने क्रूरतेचा अवलंब केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
बलुचिस्तानमध्ये बलोच नॅशनल मुव्हमेंट (बीएनएम) आणि बलोच स्टुडंट-ऑर्गनायझेशन आझाद (बीएसओ-ए) सारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या निदर्शनांवर पाकिस्तानी लष्कराने बळाचा वापर केला आहे. पाकिस्तानी लष्कराने बलोच नॅशनल मुव्हमेंटचे प्रमुख कार्यकर्ते मेहरंग बलोच आणि इतर अनेक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. शनिवारी पहाटे राज्य सुरक्षा दलांनी केलेल्या क्रूर कारवाईत महिला आणि मुलांवर हल्ला करण्यात आला. धरणे स्थळावरून एक मृतदेहही सापडल्याचे समजते.
बलुचिस्तानमधील प्रख्यात कार्यकर्ते मेहरंग बलोच यांनी क्वेटामध्ये शांततापूर्ण निदर्शकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आणि एका निदर्शकाचा मृत्यू झाला. मेहरंग बलोच यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
बलुचिस्तानमधील मानवी हक्क उल्लंघनाच्या परिस्थितीबाबत जिनेव्हा येथे नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 58 व्या सत्रातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. बलुचिस्तानमधील सुरू असलेल्या दडपशाही आणि अत्याचारांवर बलुचिस्तान नॅशनल मूव्हमेंटच्या (बीएनएम) परराष्ट्र विभागाचे समन्वयक आणि केंद्रीय समिती सदस्य नियाज बलोच यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
...ही चिंतेची बाब
नियाज बलोच यांनी बलोच स्टुडंट्स ऑर्गनायझेशन-आझाद (बीएसओ-ए) आणि बीएनएमसारख्या बलोच राजकीय संघटनांवरील दडपशाहीचा उल्लेख केला. येथे संघटनेच्या सदस्यांना मनमानीपणे ताब्यात घेतले जाते, छळ केला जातो आणि त्यांचा आवाज दाबला जातो, असे ते म्हणाले. लोकांना बेपत्ता करणे हे बलुचिस्तानमध्ये दडपशाहीचे एक पद्धतशीर साधन बनले आहे. या घटना राज्य समर्थित गटांकडून घडवून आणल्या जात असल्यामुळे बलोच कुटुंबांना सामूहिक शिक्षेचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. बलुचिस्तानमधील लोक बऱ्याच काळापासून या दडपशाही धोरणांचे बळी पडत असल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.