For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानी दहशतवाद्याचा दया अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला

06:35 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानी दहशतवाद्याचा दया अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला
Advertisement

लाल किल्ल्यावरील हल्ला प्रकरणाचा गुन्sहगार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सुमारे 24 वर्षांपूर्वी झालेल्या लाल किल्ल्यावरील हल्ल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद आरिफ उर्फ अशफाकचा दया अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळला आहे. यासंबंधीची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली आहे. राष्ट्रपतींकडून 25 जुलै 2022 रोजी पदभार स्वीकारल्यावर फेटाळण्यात आलेला हा दुसरा दया अर्ज आहे.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने 3 नोव्हेंबर 2022 रोजी आरिफची पुनर्विचार याचिका फेटाळली होती. तसेच त्याचा मृत्यूदंड कायम ठेवला होता. मृत्युदंड ठोठावण्यात आलेला आरिफ अद्याप घटनेचे अनुच्छेद 32 अंतर्गत दीर्घकाळापर्यंत झालेल्या विलंबाच्या आधारावर स्वत:च्या शिक्षेत घट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो.

15 मे रोजी आरिफकडून दया अर्ज प्राप्त झाला होता, जो 27 मे रोजी फेटाळण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती सचिवालयाच्या आदेशाचा दाखला देत सांगितले आहे. आरिफच्या बाजूने एकही असा पुरावा नव्हता, ज्यामुळे त्याच्या गुन्ह्याचे गांभीर्य कमी होईल असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंड कायम ठेवला होता.

लाल किल्ल्यावरील हल्ला हा देशाची एकता, सार्वभौमत्वासाठी थेट धोका होता असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. 22 डिसेंबर 2000 रोजी लाल किल्ला परिसरात तैनात 7 राजपूताना रायफल्सच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, या हल्ल्यात तीन सैनिक हुतात्मा झाले होते.

लष्कर-ए-तोयबाचा होता हात

पाकिस्तानी नागरिक आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आरिफला हल्ल्याच्या चार दिवसांनी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. आरिफला अन्य दहशतवाद्यांसोबत मिळून हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. तसेच न्यायालयाने 2005 साली त्याला मृत्युदंड ठोठावला होता. दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेच्या विरोधातील त्याची याचिका फेटाळली होती.

Advertisement
Tags :

.