पंजाब-तरनतारनमध्ये पाकिस्तानी ड्रोन जप्त
चंदीगड : /
जाबमधील तरनतारनमधील कलश हवेलियन गावात पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आले आहे. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान बुधवारी सकाळी 7.40 वाजता क्वाडकॉप्टर ड्रोन मॉडेल डीजेआय मॅट्रिस 300 आरटीके सापडल्याची माहिती देण्यात आली. पहाटेच्या सुमारास अमली पदार्थ किंवा शस्त्रास्त्रे पोहोचविण्याच्या उद्देशाने हे ड्रोन पाठविण्यात आले असावे, अशी शक्यता गृहीत धरून परिसरात संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यात आला. मात्र, सायंकाळपर्यंत ड्रोन सापडलेल्या परिसरात अमली पदार्थ किंवा शस्त्रास्त्रे सापडली नाहीत.
पूंछमध्येही घुसखोरी
जम्मू : पूंछ जिह्यातील कृष्णा खोऱ्यात नियंत्रण रेषेवरून ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. सतर्क सैनिकांनी नियंत्रण रेषेवर संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर लगेच गोळीबार केला. यानंतर ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने माघारी फिरले. कृष्णा खोऱ्यातील नियंत्रण रेषेजवळ ड्रोनची हालचाल आढळून आली आहे. नियंत्रण रेषेवर पहारा देणाऱ्या जवानांनी काही राऊंड फायर केल्यामुळे ड्रोन पाकिस्तानी सीमेमध्ये परतले.
याआधी मंगळवारी संध्याकाळी पुंछमधील नियंत्रण रेषेवर असलेला करमाडा परिसर गोळ्यांच्या आवाजाने दुमदुमला. घुसखोरांना पाहताच भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याने आपापल्या भागात सुमारे 15 मिनिटे गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरातील नागरिक घाबरले. संध्याकाळी उशिरा झालेल्या गोळीबाराबाबत सुरक्षा दलांनी युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा इन्कार केला आहे.