पाकिस्तानी ‘बॅट’चा हल्ला सैन्याने उधळला
उरी सेक्टरमध्ये सैन्याकडून शोधमोहीम जारी
वृत्तसंस्था/श्रीनगर
पाकिस्तानी सैन्याच्या बॅट (बॉर्डर अॅक्शन टीम) पथकाने बुधवारी पहाटे उत्तर काश्मीरच्या उरी (बारामुला) सेक्टरमध्ये भारतीय क्षेत्रात हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क भारतीय जवानांमुळे बॅटला पळ काढावा लागला. सैनिकांनी उरी सेक्टरमध्ये एलओसीच्या परिसरात आता शोधमोहीम हाती घेतली आहे. उरी सेक्टरमध्ये कमलकोट-लच्छीपोरामध्ये एलओसीवर गस्त घालत असलेल्या भारतीय सैन्याच्या 08 राष्ट्रीय रायफल्सच्या सैनिकांनी स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी युक्त 4-5 जणांना पाहिले होते. हे संशयित एका चौकीच्या दिशेने जात असल्याचे पाहून भारतीय सैनिकांना ही सामान्य दहशतवाद्यांची घुसखोरी नव्हे तर पाकिस्तानी सैन्याच्या बॅटचे पथक असल्याचे कळून चुकले.
भारतीय सैनिकांनी त्वरित आसपासच्या चौक्यांना सतर्क केले पाकिस्तानी बॅट पथक पुढे सरकताच भारतीय सैनिकांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. कट उधळला जात असल्याचे कळताचे पाकिस्तानी बॅट पथकाने भारतीय सैनिकांच्या दिशेने गोळीबार केला. यावर भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. 15-20 मिनिटांपर्यंत दोन्ही बाजूने भीषण गोळीबार झाला. पाकिस्तानी सैन्याचे बॅट पथक तेथून पळून गेले असण्याची शक्यता आहे, तर पाकिस्तानचा एखादा सैनिक मारला गेला असण्याची किंवा तेथेच आसपास लपून बसलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भारतीय सैन्याने पूर्ण परिसरात शोधमोहीम हाती घेतली. या भागात सर्वसामान्य लोकांना येण्यास मनाई करण्यात आली असून तेथे नो मूव्हमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.