पाकिस्तानने 22 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात जिंकली वनडे मालिका
तिसऱ्या वनडेत कांगांरुचा 140 धावांत खुर्दा : 2-1 ने मालिका जिंकत केली ऐतिहासिक कामगिरी
वृत्तसंस्था/ पर्थ
नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदीच्या घातक गोलंदाजीनंतर पाकिस्तानने दमदार फलंदाजीच्या जोरावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना पाकने कांगांरुना 140 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 26.5 षटकांत केवळ 2 विकेट्स गमावून सामना जिंकला. विशेष म्हणजे, तब्बल 22 वर्षांनंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर वनडे मालिकेत पराभूत केले आहे.
मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून विजय मिळवला होता, पण त्यानंतर पाकिस्तानने जोरदार पलटवार करत दोन्ही सामने जिंकून इतिहास रचला. दुसरा एकदिवसीय सामना अॅडलेड ओव्हल येथे खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पाकच्या वेगवान गोलंदाजासमोर ढेपाळलेले दिसले. या सामन्यात पाकिस्तानने 9 गडी राखून शानदार विजय नोंदवला होता. आता तिसरा सामना जिंकून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मोठा पराक्रम केला आहे.
कांगांरुना 140 धावांत गुंडाळले
प्रारंभी, पाकचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नसीम शाह व हॅरिस रौफ यांनी हा निर्णय सार्थ ठरवत कांगांरुना 31.5 षटकांत अवघ्या 140 धावांत गुंडाळले. ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला जॅक फ्रेझर मॅकगर्क फ्लॉप ठरला. त्याला नसीम शाहने बाद केले. एका चौकाराच्या जोरावर त्याला 9 चेंडूत केवळ 7 धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेला अॅरॉन हार्डीही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. हार्डीला शाहीन आफ्रिदीने बाद केले. तो 13 चेंडूंत 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 36 धावांत दोन गडी बाद झाल्यानंतर कांगारूंना कर्णधार जोश इंग्लिसकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्याने पुन्हा एकदा निराशा केली. जोश इंग्लिश 19 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने 7 धावा करून बाद झाला. यानंतर हारिस रौफने सेट झालेल्या मॅथ्यू शॉर्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 22 धावा करून तो बाद झाला.
टॉप ऑर्डर पूर्ण फ्लॉप झाल्यानंतर शेवटची आशा मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून होती. पण हे दोन दिग्गजही पाकिस्तानी गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. 8 धावा करून स्टॉइनिस बाद झाला तर मॅक्सवेलला खातेही उघडता आले नाही. सीन अॅबॉटने सर्वाधिक 30 धावा केल्या. पाककडून नसीम शाह व शाहिन आफ्रिदी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
पाकचा दणकेबाज विजय
कांगांरुनी विजयासाठी दिलेले 141 धावांचे लक्ष्य पाकने 26.5 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. फलंदाजीत सॅम आयुबने 42, अब्दुल्ला शफीकने 37 धावा, बाबर आझमने नाबाद 28 आणि मोहम्मद रिझवानने नाबाद 30 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 31.5 षटकांत सर्वबाद 140 (मॅथ्यू शॉर्ट 22, सीन अॅबॉट 30, जॉन्सन नाबाद 12, शाहिन आफ्रिदी व नसीम शाह प्रत्येकी दोन बळी, हॅरिस रौफ दोन बळी)
पाकिस्तान 26.5 षटकांत 2 बाद 143 (सॅम आयुब 42, अब्दुल्ला शफीक 37, बाबर आझम नाबाद 28, रिझवान 30, लान्स मॉरिस दोन बळी).
22 वर्षानंतर पाकने जिंकली मालिका
पाकिस्तान क्रिकेट संघ 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. 2002 मध्ये पाकने शेवटच्या वेळी हा पराक्रम केला होता. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा विजय पाकिस्तानी संघासाठी बळ देणारा ठरणार आहे. याशिवाय मोहम्मद रिझवाननेही आपल्या कर्णधारपदात दमदार सुरुवात केली आहे.
कांगांरुविरुद्ध पाकचा वनडे मालिकाविजय
2002 मध्ये पाकिस्तान 3-2 ऑस्ट्रेलिया
2010 मध्ये पाकिस्तान 0-5 ऑस्ट्रेलिया
2017 मध्ये पाकिस्तान 1-4 ऑस्ट्रेलिया
2024 मध्ये पाकिस्तान 2-1 ऑस्ट्रेलिया.