पाक महिला संघाचा सुपरओव्हरमध्ये विजय
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
पाकचा महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून उभय संघातील झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात पाकने यजमान न्यूझीलंडचा सूपर ओव्हरमध्ये पराभव केला. तीन सामन्यांची ही वनडे मालिका न्यूझीलंडने 2-1 अशा फरकाने जिंकली. पाकच्या बिस्माह मारूफला ‘सामनावीर’ तर न्यूझीलंडच्या अॅमेलिया केरला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील पहिले दोन सामने न्यूझीलंडच्या महिला संघाने जिंकून आघाडी मिळविली होती. या मालिकेतील सोमवारी येथे तिसरा आणि शेवटचा सामना खेळविला गेला. दिवस-रात्रीच्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने 50 षटकात 8 बाद 251 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 50 षटकात 9 बाद 251 धावा जमवित हा सामना टाय राखला. पंचांनी सदर सामना सुपर ओव्हरमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला. पाकच्या महिला संघाने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये अॅमेलिया केर आणि मॅडी ग्रीन यांनी शानदार अर्धशतके झळकवली. बेट्सने 40 चेंडूत 1 चौकारासह 24, गॅझेने 9, अॅमेलिया केरने 87 चेंडूत 5 चौकारांसह 77, कर्णधार सोफी डिव्हाईनने 69 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 65, रोने 11 तर जेस केरने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. अॅमेलिया केर आणि कर्णधार डिव्हाईन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 56 धावांची भागिदारी केली. डिव्हाईन बाद झाल्यानंतर अॅमेलिया केरने मॅडी ग्रीन समवेत चौथ्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या डावात 1 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे नेशरा संधू तसेच गुलाम फातिमाने प्रत्येकी 2 गडी बाद केले. हनीने 51 धावात 1 बळी मिळविला. न्यूझीलंडचे 3 फलंदाज धावचीत झाले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावामध्ये बिस्माह मारूफने 86 चेंडूत 5 चौकारांसह 68, सिद्रा आमिनने 22 चेंडूत 5 चौकारांसह 24, अलिया रियाझने 84 चेंडूत 4 चौकारांसह 44, कर्णधार फातिमा सनाने 33 चेंडूत 3 चौकारांसह 36, नजिहा अल्विने 26 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 23, परबेजने 1 षटकार आणि 1 चौकारासह 26 धावा जमविल्या. पाकने 50 षटकात 9 बाद 251 धावा जमवित हा सामना टाय राखला. न्यूझीलंडतर्फे ताहुहू आणि अॅमेलिया केर यांनी प्रत्येकी 2 तर जेस केर, रो, जोनास व डिव्हाईन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पंचांनी यानंतर सुपर ओव्हरचा अवलंब केला. त्यामध्ये पाकने न्यूझीलंडचा पराभव केला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 50 षटकात 8 बाद 251 (बेट्स 24, गॅझे 9, अॅमेलिया केर 77, ग्रीन नाबाद 65, सोफी डिव्हाईन 29, रो 11, जेस केर 19, अवांतर 9, संधू आणि गुलाम फातिमा प्रत्येकी 2 बळी, हनी 1-51), पाक 50 षटकात 9 बाद 251 (आमिन 24, मारूफ 68, अलिया रियाझ 44, फातिमा सना 36, परवेज 26, अल्वि नाबाद 23, अवांतर 19, अॅमेलिया केर व ताहुहू प्रत्येकी 2 बळी, जेस केर, रो, जोनास आणि सोफी डिव्हाईन प्रत्येकी 1 बळी).