For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाक महिला क्रिकेट संघाचा मालिका विजय

06:11 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
पाक महिला क्रिकेट संघाचा मालिका विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ ड्युनेडीन

Advertisement

पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. पाक आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली गेली. मंगळवारी येथे झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकने यजमान न्यूझीलंडचा 10 धावांनी पराभव करत ही मालिका 2-0 अशी जिंकली. पाकच्या अलिया रियाझला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. पाक महिला क्रिकेट संघाने विदेशात 2018 नंतर पहिल्यांदाच टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

या मालिकेत पाक महिला क्रिकेट संघाचा दर्जा निश्चितच उंचावल्याचे दिसून येते. न्यूझीलंड संघावरील पाक संघाचा हा पहिलाच मालिका विजय आहे. मंगळवारच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकने 20 षटकात 6 बाद 137 धावा जमवित न्यूझीलंडला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले. पण पाकने आपल्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला 20 षटकात 7 बाद 127 धावावर रोखून हा सामना 10 धावांनी जिंकत मालिका 2-0 अशी हस्तगत केली.

Advertisement

पाकच्या डावामध्ये सलामीच्या मुनीबा अलीने 28 चेंडूत 6 चौकारांसह 35, बिस्मा महारुफने 26 चेंडूत 2 चौकारांसह 21, झुल्फीकारने 1 चौकारासह 7, कर्णधार निदा दारने 14 चेंडूत 2 चौकारांसह 14, अलिया रियाझने 22 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 32, सोहेलने 6, फातिमा सनाने 4 धावा केल्या. पाकच्या डावात 1 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे जोनास आणि पेनफोल्ड यांनी प्रत्येकी 2 तर रोवे आणि डिव्हेनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात प्लिमेरने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 28, सुजी बेट्सने 18 चेंडूत 2 चौकारांसह 18, अॅमेलिया केरने 2, ग्रीनने 23 चेंडूत 2 चौकारांसह 18, कर्णधार डिव्हेनीने 1 चौकारासह 5, रोवेने 24 चेंडूत 3 चौकारांसह 33 आणि तेहुहुने 1 षटकार आणि 1 चौकारासह 9 चेंडूत नाबाद 13 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 2 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे फातिमा सनाने 22 धावात 3, सादिया इक्बालने 29 धावात 2, निदा दारने 20 धावात 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : पाक 20 षटकात 6 बाद 137 (मुनिबा अली 35, झुल्फिकार 7, महारुफ 21, निदा दार 14, अलिया रियाझ नाबाद 32, सोहेल 6, सना 4, बेग नाबाद 0, अवांतर 18, जोनास 2-21, पेनफोल्ड 2-17, रोवे 1-25, डिव्हेनी 1-8), न्यूझीलंड 20 षटकात 7 बाद 127 (बेट्स 18, अॅमेलिया केर 2, डिव्हेनी 5, ग्रीन 18, प्लिमेर 28, रोवे 33, तेहुहु नाबाद 13, पेनफोल्ड नाबाद 1, अवांतर 7, फातिमा सना 3-22, सादिया इक्बाल 2-29, निदा दार 1-20).

Advertisement
Tags :

.