पाकचा झिम्बाब्वेवर मालिका विजय
सुफीयान मुकीम ‘सामनावीर’, झिम्बाब्वेचा 10 गड्यांनी पराभव
वृत्तसंस्था / बुलावायो
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकिस्तानने यजमान झिम्बाब्वेवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकने झिम्बाब्वेचा 87 चेंडू बाकी ठेवून 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला. 3 धावांत 5 गडी बाद करणाऱ्या पाकच्या सुफियान मुकीमला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा डाव 12.4 षटकात 57 धावांत आटोपला. त्यानंतर पाकने 5.3 षटकात बिनबाद 61 धावा जमवित हा सामना 10 गड्यांनी जिंकला. या मालिकेतील पाकचा हा सलग दुसरा विजय असून त्यांनी ही मालिका हस्तगत केली आहे.
झिम्बाब्वेच्या डावात सलामीच्या बेनेटने 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21, मरुमणीने 14 चेंडूत 3 चौकारांसह 14, मदांडेने 9 धावा केल्या. पाकतर्फे सुफीयान मुकीमने 2.4 षटकात 3 धावांत 5 बळी घेतले. अब्बास आफ्रिदिने 2 धावांत 2 तर अब्रार अहमद, हॅरीस रौफ आणि सलमान आगा यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. झिम्बाब्वेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 40 धावा जमविताना 2 गडी गमविले. त्यांच्या डावात 1 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकची सलामीची जोडी ओमर युसुफ आणि सईम आयुब यांनी 33 चेंडूत अभेद्य 61 धावांची भागिदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. युसुफने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 22 तर सईम आयुबने 18 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 36 धावा झळकविल्या. पाकच्या डावात 2 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. पाकने पॉवरप्लेच्या 6 षटकार 61 धावा जमविल्या. पाकचे अर्धशतक 26 चेंडूत फलकावर लागले.
संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे 12.4 षटकात सर्वबाद 57 (बेनेट 21, मरुमणी 16, मदांडे 9, सुफीयान मुकीम 3-5, अब्बास आफ्रिदी 2-2, अब्रार अहमद 1-21, रौफ 1-13), पाक 5.3 षटकात बिनबाद 61 (ओमर युसुफ 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 22, सईम आयुब 18 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 36, अवांतर 3),