बांगलादेशने 15 वर्षानंतर रचला इतिहास, विंडीज घरच्या मैदानावर पराभूत
दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा 101 धावांनी विजय : तैजुल इस्लाम सामनावीर तर तस्कीन अहमद मालिकावीर
वृत्तसंस्था
किंग्जस्टन (वेस्ट इंडिज)
बांगलादेशने सबिना पार्कवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा 101 धावांनी पराभव करुन 15 वर्षांतील पहिला कसोटी विजय नोंदवला. तसेच दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत देखील सोडवली. दुसऱ्या डावात जाकर अलीच्या 91 धावांच्या प्रतिकारामुळे बांगलादेशने विंडीजला 287 धावांचे लक्ष्य दिले होते. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना डावखुरा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामने पाच विकेट घेत वेस्ट इंडिजला 185 धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, बांगलादेशने शेवटचा कसोटी सामना 2009 मध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर जिंकला होता. आता, 8 डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
सबिना पार्कवर खेळवल्या गेलेल्या या कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. विंडीजच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा संघ 164 धावांत ऑलआऊट झाला. प्रत्युतरात विंडीजलाही पहिल्या डावात केवळ 146 धावा करता आल्या. यामुळे बांगलादेशला पहिल्या डावात 18 धावांची आघाडी मिळाली. यानंतर मंगळवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने 5 बाद 193 धावसंख्येवरुन खेळण्यास सुरुवात केली. अवघ्या 75 धावांची भर घातल्यानंतर बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 268 धावात ऑलआऊट झाला आणि वेस्ट इंडिजला 287 धावांचे लक्ष्य मिळाले. जाकर अलीने सर्वाधिक 91 धावा करताना 8 चौकार व 5 षटकार लगावले. त्याने मधल्या फळीत तैजुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 268 धावांपर्यंत नेली. तैजुल इस्लामने 14 धावांचे योगदान दिले तर इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले.
विंडीज फलंदाजांचे लोटांगण
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 185 धावांत सर्वबाद झाला. विंडीजकडून सलामीवीर क्रेग ब्रॅथवेटने 43 आणि हॉजने सर्वाधिक 55 धावांचे योगदान दिले. जस्टिन ग्रेव्हसने 20 धावा केल्या. उर्वरित फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने विंडीजला घरच्या मैदानावर 101 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या डावात एक बळी घेणाऱ्या तैजुल इस्लामने दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश पहिला डाव 164 व दुसरा डाव 268
वेस्ट इंडिज पहिला डाव 146 व दुसरा डाव 50 षटकांत सर्वबाद 185 (हॉज 55, क्रेग ब्रेथवेट 43, ग्रेव्हस 20, तैजुल इस्लाम 5 बळी, हसन महमूद व तस्कीन अहमद प्रत्येकी दोन बळी).
होमग्राऊंडवर विंडीजचा नामुष्कीजनक पराभव, बांगलादेशचा ऐतिहासिक विजय
2009 मध्ये विंडीज दौऱ्यावर गेलेल्या बांगलादेशने कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा शेवटचा पराभव केला होता. ग्रेनेडाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने 4 गडी राखून विजय मिळवला होता. आता 15 वर्षांनंतर वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात पराभूत करण्यात त्यांना यश आले आहे. 2024 हे वर्ष बांगलादेश संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये फारसे खास नसले तरी परदेशातील त्यांचा हा तिसरा कसोटी विजय आहे. आतापर्यंत, बांगलादेश संघाने कोणत्याही कॅलेंडर वर्षात घराबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवले आहेत