पाकचा आयर्लंडवर सात गड्यांनी विजय
टी-20 मालिकेत 1-1 बरोबरीत
वृत्तसंस्था/ डब्लीन
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने यजमान आयर्लंडचा 19 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी पराभव केला. या विजयामुळे पाकने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. यजमान आयर्लंडने पहिला सामना जिंकून आघाडी मिळविली होती. दुसऱ्या सामन्यात पाकच्या मोहम्मद रिझवानला सामनावीर घोषित करण्यात आले.
या दुसऱ्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने 20 षटकात 7 बाद 193 धावा जमवित पाकला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर पाकने 16.5 षटकात 3 बाद 195 धावा जमवित विजय नोंदविला.
आयर्लंडच्या डावामध्ये टकेरने 34 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 51, टेक्टरने 28 चेंडूत 4 चौकारांसह 32, कॅम्फरने 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 22, बलबिर्नीने 14 चेंडूत 3 चौकारांसह 16, कर्णधार स्टर्लिंगने 2 चौकारांसह 11, डॉकरेलने 8 चेंडूत 3 चौकारांसह 15 आणि डेलॅनीने 10 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 28 धावा झोडपल्या. अॅडेरने 2 चौकारांसह 9 धावा केल्या. टेक्टर आणि टकेर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 62 धावांची भागिदारी केली. आयर्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 55 धावा जमविताना 2 गडी गमविले. टकेरने 32 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकवले. आयर्लंडच्या डावात 6 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शाहिन आफ्रिदीने 3, अब्बास आफ्रिदीने 2 तर मोहम्मद आमिर व नसिम शहा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावामध्ये पहिल्या षटकात आयर्लंडच्या अॅडेरने सईम आयुबला 6 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर ग्रॅहम ह्युमने कर्णधार बाबर आझमला खाते उघडण्यापूर्वीच टकेरकरवी झेलबाद केले. पाकची स्थिती यावेळी 2 बाद 13 अशी होती. मोहम्मद रिझवान आणि फखर झमान या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 140 धावांची शतकी भागिदारी करीत पाकला विजयासमीप आणले. आयर्लंडच्या व्हाईटने फखर झमानला झेलबाद केले. त्याने 40 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांसह 78 धावा झळकवल्या. झमान बाद झाला त्यावेळी पाक संघाला विजयासाठी 43 धावांची गरज होती. मोहम्मद रिझवान आणि आझम खान यांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 42 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला 19 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी विजय मिळवून दिला. रिझवानने 46 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 75 तर आझम खानने 10 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 30 धावा जमविल्या. पाकच्या डावात 15 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे मार्क अॅडेर, ह्युम आणि व्हाईट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकने पॉवरप्लेमधील 6 षटकात 57 धावा जमविताना 2 गडी गमविले. रिझवानने आपले अर्धशतक 34 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने तर झमानने आपले अर्धशतक 31 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. पाकचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 65 चेंडूत, दीडशतक 87 चेंडूत नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक - आयर्लंड 20 षटकात 7 बाद 193 (टेक्टर 32, टकेर 51, डेलॅनी नाबाद 28, कॅम्फर 22, बलबिर्नी 16, स्टर्लिंग 11, डॉकरेल 15, अवांतर 7, शाहिन आफ्रिदी 3-49, अब्बास आफ्रिदी 2-33, मोहम्मद आमिर व नशिम शहा प्रत्येकी 1 बळी), पाक 16.5 षटकात 3 बाद 195 (मोहम्मद रिझवान नाबाद 75, फखर झमान 78, आझम खान नाबाद 30, अवांतर 6, अॅडेर, ह्युम आणि व्हाईट प्रत्येकी 1 बळी).