भारताला शस्त्रास्त्र मिळाल्याने बिथरला पाकिस्तान
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत केला आरोप : अस्थिरता वाढणार
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानने अप्रत्यक्ष स्वरुपात भारताला जागतिक कंपन्यांकडून मिळणाऱ्या शस्त्रास्त्रांवर आक्षेप घेतला आहे. दक्षिण आशियातील एका देशाला पारंपरिक शस्त्रास्त्रांचा सहजपणे होणारा पुरवठा चिंतेचा विषय आहे. हा प्रकार अस्थिरतेला बळ देणारा असून तणावग्रस्त क्षेत्रातील शक्ती संतुलन धोक्यात आणत आहे. संकीर्ण राजनयिक, राजकीय आणि वाणिज्यिक हितांसाठी दक्षिण आशियासंबंधी दुटप्पी निकषांचे धोरण जागतिक समुदायाने बदलण्याची गरज असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसघातील पाकिस्तानचे प्रतिनिधी मोहम्मद उस्मान इक्बाल जादून यांनी केला आहे.
पारंपरिक शस्त्रास्त्रांना मर्यादित आणि हळूहळू कमी करण्याचे लक्ष्य साकार झालेले नाही. याऐवजी जागतिक सैन्यखर्चात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण आशियात एका देशाचा सैन्य खर्च हा अन्य सर्व देशांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. या देशाला होणार पारंपरिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा याच्या रणनीतिक क्षमतांसोबत अस्थिरतेला बळ देत आहे. यामुळे दीर्घकाळापासून चालत आलेल्या वादांवर तोडगा निघणे अशक्य ठरत असल्याचा दावा पाकिस्तानी प्रतिनिधीने केला आहे.
दक्षिण आशियात पारंपरिक असंतुलन वाढत असून यामुळे अनेक धोके उदयास येणार आहेत. यामुळे अण्वस्त्रसज्ज देशांदरम्यान संघर्षही भडकू शकतो. पाकिस्तान दक्षिण आशियात एक रणनीतिक संयमी शासनाच्या स्थापनेसाठी प्रतिबद्ध असून यात पारंपरिक शक्ती संतुलन सामील आहे. पाकिस्तान दक्षिण आशियात शस्त्रास्त्रांची चढाओढ इच्छित नाही. दक्षिण आशियात शांतता आणि स्थैर्य केवळ सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांनुसार वादांवर तोडगा आणि रणनीतिक सैन्यशक्तीच्या संतुलनाला राखूनच प्राप्त करता येणार असल्याचे आमचे मानणे असल्याचे जादून यांनी म्हटले आहे.
अवैध शस्त्रास्त्रांच्या प्रसाराचे संकट संपविण्याकरता विकसनशील देशांचे समर्थन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मजबूत प्रतिबद्धतेची गरज आहे. दहशतवादी गटांपर्यंत आधुनिक शस्त्रास्त्रs कशी पोहोचत आहेत याची चौकशी केली जावी. शस्त्रास्त्रांचा अवैध व्यापार आणि हस्तांतरण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी सर्व देश आणि संयुक्त राष्ट्रसंघाची असल्याचे जादून यांनी म्हटले आहे.