पहिल्या डावात पाकिस्तान 124 धावांनी पिछाडीवर
पाक 6 बाद 194, शफीक, मसूदची अर्धशतके, कमिन्सचे 3 बळी, ऑस्ट्रेलिया 318
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 318 धावांवर आटोपल्यानंतर पाकने पहिल्या डावात दिवसअखेर 6 बाद 194 धावा जमविल्या असून ते अद्याप 124 धावांनी मागे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने अर्धशतक साजरे केले तर तब्बल 52 धावा त्यांना अवांतराच्या रूपात मिळाल्या. पाकतर्फे सलामीवीर अब्दुल्ला शफीक व कर्णधार शान मसूद यांनी अर्धशतके नोंदवली तर कमिन्सने 3 बळी टिपले.
या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 3 बाद 187 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या खेळास प्रारंभ केला आणि त्यात उर्वरित फलंदाजांनी आणखी 131 धावांची भर घातल्यानंतर त्यांचा डाव 318 धावांवर संपुष्टात आला. सीम व स्विंग होणाऱ्या खेळपट्टीचा लाभ उठवत पाकच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे उर्वरित सात गडी लवकर बाद केले. पहिल्या दिवशी नाबाद राहिलेल्या लाबुशेनने अर्धशतक पूर्ण केले. त्याने सर्वाधिक 63 धावा जमविल्या. पाकच्या अमीर जमालने 64 धावांत 3 बळी टिपले. याशिवाय हेडने 17, मिचेल मार्शने 60 चेंडूत 41 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला 52 धावा मिळाल्या. त्यात 15 वाईड, 20 बाईज, 15 लेगबाईज व 2 नोबॉल्सचा समावेश आहे. शाहीन शहा आफ्रिदी, मिर हामझा, हसन अली यांनी प्रत्येकी 2 तर आगा सलमानने एक बळी मिळविला.
इमाम उल हक व शफीक यांनी पाकच्या डावाला सकारात्मक सुरुवात केली. अनेक अपील्समधून बचावल्यानंतर स्पिनर लियॉनने हकला स्लिपमध्ये लाबुशेनकडे झेल देण्यास भाग पाडले. पाकने चहापानानंतर धावांचा वेग वाढवला आणि शफीकने ऑस्ट्रेलियातील पहिले व एकूण पाचवे अर्धशतक स्टार्कला चौकार ठोकून पूर्ण केले. मात्र त्याची मसूदसमवेतची 90 धावांची भागीदारी कमिन्सने संपुष्टात आणली. कमिन्सने स्वत:च्याच गोलंदाजीवर डावीकडे झेपावत अप्रतिम झेल टिपला. शफीकने 5 चौकारांसह 62 धावा काढल्या. कमिन्सने नंतर एका अप्रतिम चेंडूवर बाबर आझमचा त्रिफळा उडवला. बाबरने 7 चेंडूत केवळ एक धाव जमविली. लियॉनने दुसरा बळी मिळविताना मसूदला मार्शकरवी झेलबाद केला. त्याने 76 चेंडूत 54 धावा जमविताना 3 चौकार, 1 षटकार मारला. हेझलवुडने नंतर सौद शकीलला 9 धावांवर बाद केले तर कमिन्सने तिसरा बळी मिळविताना आगा सलमानने 5 धावांवर बाद केले. पाकची स्थिती 1 बाद 124 अशी भक्कम होती. पण शफीक बाद झाल्यानंतर त्यांची स्थिती 6 बाद 170 अशी झाली. रिझवान व आमीर जमाल यांनी उर्वरित वेळ खेळून काढला. दिवसअखेर पाकने 6 बाद 194 धावांपर्यंत मजल मारली. fिरझवान 29 व जमाल 2 धावांवर खेळत होते. कमिन्सने 3 तर लियॉनने 2 व हेझलवुडने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 96.5 षटकांत सर्व बाद 318 : लाबुशेन 63, उस्मान ख्वाजा 42, मार्श 41, वॉर्नर 38, स्मिथ 26, हेड 17, कमिन्स 13, अवांतर 52. गोलंदाजी : अमीर जमाल 3-64, हसन अली 2-61, मिर हामझा 2-51, शाहीन आफ्रिदी 2-85, आगा सलमान 1-22.
पाक प.डाव 55 षटकांत 6 बाद 194 : शफीक 62, मसूद 54, इमाम उल हक 10, रिझवान खेळत आहे 29, बाबर आझम 1, शकील 9, आगा 5, जमाल खेळत आहे 2, अवांतर 22. गोलंदाजी : कमिन्स 3-37, लियॉन 2-48, हेझलवुड 1-29.