‘ब्लॉकबस्टर’पूर्वी पाकची आज ओमानशी गाठ
वृत्तसंस्था/दुबई
भारताविऊद्धच्या हाय-प्रोफाइल आशिया कप सामन्यापूर्वी पाकिस्तान आज शुक्रवारी येथे होणाऱ्या गट ‘अ’मधील आपल्या ओमानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानने अंतिम सामन्यात अफगाणिस्तानला 75 धावांनी हरवून टी-20 तिरंगी मालिकेत दमदार कामगिरी करत स्पर्धेत प्रवेश केला आहे. मोहम्मद नवाजच्या हॅट्ट्रिकने त्यांना मालिकेत व्यापक विजय मिळवून दिला. या मालिकेत यूएईचाही समावेश होता.
जागतिक स्तरावर आठव्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी भारताविऊद्धच्या त्यांच्या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी मौल्यवान अनुभव मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवेल. यूएईमधील संथ खेळपट्ट्यांनी पाकिस्तानला फिरकीपटूंना संघात समाविष्ट करण्यास प्रवृत्त केले आहे. ही रणनीती तिरंगी मालिकेदरम्यान यशस्वी ठरली आणि आशिया कपमध्येही ती महत्त्वाची ठरेल. ‘आम्हाला आशिया कपसाठी मदत होईल अशा पद्धतीने तयारी करायची होती आणि आम्ही ते केले आहे’, असे पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने म्हटलेले आहे. गट ‘अ’मध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई यांचा समावेश आहे. भारत-पाकिस्तान सामना रविवारी दुबईमध्ये होणार आहे.
गट ‘ब’मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 टप्प्यात जातील, जिथे राउंड-रॉबिन स्वरूपात अंतिम फेरीतील संघ निश्चित होतील. सुपर 4 मधील अव्वल दोन संघ 28 सप्टेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीत एकमेकांशी लढतील. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही माजी विजेते असून सुपर 4 मध्ये पोहोचण्याच्या आणि कदाचित बहुप्रतिक्षित अंतिम फेरीत पुन्हा एकमेकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने ते प्रबळ दावेदार आहेत. पाकिस्तानने आगाच्या नेतृत्वाखाली तऊण संघाची निवड केली आहे, ज्याचे आधीच सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. सइम अयुब, फखर झमान, मोहम्मद नवाज, सुफियान मुकीम आणि आगा हे खेळाडू सामना जिंकण्याच्या दृष्टीने मोलाचे ठरतील अशी अपेक्षा आहे. संघाचे फिरकी गोलंदाज प्रभावी दिसत आहेत, जे यूएईच्या खेळपट्ट्यांवर परिणामकारक ठरू शकतात. आगाच्या नेतृत्वाखालील टी-20 संघाने आक्रमक मानसिकता स्वीकारली आहे.
पाकिस्तान : सलमान आगा (कर्णधार), फखर जमान, हसन नवाज, खुशदिल शाह, सैम अयूब, हुसेन तलत, फहीम अश्रफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद हारिस, साहिबजादा फरहान, अबरार अहमद, हरिस रौफ, हसन अली, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, मोहम्मद वसिम ज्युनियर.
ओमान : जतिंदर सिंग (कर्णधार), आशिष ओडेदरा, आमिर कलीम, करण सोनावले, हसनैन शाह, मोहम्मद नदीम, विनायक शुक्ला, हम्माद मिर्झा, सुफयान मेहमूद, आर्यन बिश्त, शकील अहमद, समय श्रीवास्तव, मोहम्मद इम्रान.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.