पाकने घरच्या मैदानावर आफ्रिकेला दिला दणका
दुसऱ्या वनडेत पाकचा 81 धावांनी विजय : मालिकेत 2-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/ केप टाऊन
पाकिस्तानने मोठा धमाका करत दक्षिण आफ्रिकेचा घरच्या मैदानावरच त्यांचा लाजिरवाणा पराभव केला. पाकिस्तान अनेकदा नवख्या संघांसमोर टिकत नाही. पण आता त्यांनी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला आहे. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या एकदिवसीय सामन्यात पाकने यजमान आफ्रिकेचा 81 धावांनी पराभव केला. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे. यासह पाकिस्तानने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 22 रोजी जोहान्सबर्ग येथे होईल.
पाकिस्तान आणि आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना केपटाऊनमध्ये खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकन संघापेक्षा पाकिस्तानसाठी हा निर्णय योग्य ठरला. बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि कामरान गुलाम यांच्या खेळीमुळे त्यांनी 50 षटकांत 329 धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 43.1 षटकांत 248 धावा करून सर्वबाद झाला.
बाबर आझम, रिझवान, गुलाम यांची अर्धशतके
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकची सुरुवात खराब झाली. अवघ्या 53 धावांत त्यांनी दोन विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर बाबर आझम (73) आणि मोहम्मद रिझवान (80) यांनी संघाचा डाव सावरला. अर्धशतकानंतर बाबर आझम बाद झाला. यानंतर आलेल्या सलमान आगाने 33 धावांचे योगदान दिले. पण तोही फार काळ मैदानावर टिकला नाही. कामरान गुलामने आक्रमक खेळी करताना 32 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारासह 63 धावा फटकावल्या. गुलामच्या या तुफानी खेळीमुळे पाकला त्रिशतकी मजल मारता आली. त्याला इतर फलंदाजांची मा साथ मिळाली नाही. यामुळे पाकचा डाव 49.5 षटकांत 329 धावांत संपुष्टात आला.
होमग्राऊंडवर आफ्रिकेवर नामुष्की
329 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. त्याची पहिली विकेट केवळ 34 धावांवर पडली. कर्णधार टेंबा बवुमा 12 धावा करून बाद झाला. टोनी डी जोर्जी 34 धावा केल्या. तर एडन मार्कराम 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आफ्रिकेने 113 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन यांनी संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी झाली. क्लासेनने सर्वाधिक 74 चेंडूत 97 धावा केल्या, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. मिलर 29 धावा करुन माघारी परतला. इतर तळाच्या फलंदाजांनी निराशा केली. यामुळे आफ्रिकन संघ 248 धावांत ऑलआऊट झाला. पाककडून शाहिन आफ्रिदीने 4 तर नसीम शाहने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 49.5 षटकांत सर्वबाद 329 (बाबर आझम 73, मोहम्मद रिझवान 80, कामरान गुलाम 63, सलमान आगा 33, माफाफा 4 तर यान्सेन 3 बळी)
दक्षिण आफ्रिका 43.1 षटकांत सर्वबाद 248 (क्लासेन 97, मिलर 29, डी जोर्जी 34, शाहिन आफ्रिदी 4 तर नसीम शाह 3 बळी).
मोहम्मद रिझवान व क्लासेन यांच्यात राडा
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना गुरुवारी केपटाऊनमध्ये खेळला गेला. या सामन्यादरम्यान मोहम्मद रिझवान, हॅरिस रौफ आणि हेनरिक क्लासेन यांच्यात तुफान राडा झाला. दोन्ही संघाच्या या खेळाडूंनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आयसीसीने या प्रकरणाची अद्याप दखल घेतलेली नाही. आफ्रिकेचा संघ फलंदाजी करत होता. तेव्हा त्यांच्या डावाच्या 26 व्या षटकात हा गोंधळ झाला. पाकिस्तानसाठी हे षटक टाकण्यासाठी हॅरिस रौफ आला. या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूनंतर रौफने क्लासेनकडे पाहत काहीतरी म्हटले. हे क्लासेनला आवडले नाही. या दरम्यान, रिझवानही तेथे पोहोचला आणि प्रकरण वाढले आणि खूपच गंभीर झाले. पंचांनी हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद थांबला पण या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.