पाकिस्तानची एलओसीजवळ हॉवित्झर तोफेची चाचणी
चीनच्या मदतीने निर्मिती : 30 किमीपर्यंत तोफगोळे मारण्याची क्षमता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) 155 एमएम ट्रक-माउंट हॉवित्झर गन आणि इतर शस्त्रांची चाचणी केली आहे. मात्र ही चाचणी कधी झाली याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. 155 एमएमची तोफ एका आखाती देशाच्या मदतीने चीनच्या संरक्षण कंपनीच्या देखरेखीखाली तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
155 एमएम तोफ ही एसएच-15 हॉवित्झरची आवृत्ती असून ती त्याच्या ‘शूट अँड स्कूट’ क्षमतेसाठी ओळखली जाते. हॉवित्झर 155 एमएम तोफ अनेक प्रकारच्या शस्त्रांनी हल्ला करण्यास सक्षम आहे. ती 30 किमी अंतरापर्यंत हल्ला करू शकते आणि एका मिनिटात 6 शेल फायर करू शकते. पाकिस्तानकडून घेण्यात आलेल्या शस्त्रास्त्र चाचणीत प्रगत एम 109 तोफेचाही समावेश आहे. ही तोफ 24 किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करू शकते आणि 40 सेकंदात 6 शेल फायर करू शकते.
चीनच्या मदतीने पाकिस्तानच्या चाचण्या
चीन पाकिस्तानला नियंत्रण रेषेवर लष्करी क्षमता वाढवण्यासाठी मदत करत आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान सीमेवर बंकर, ड्रोन, लढाऊ विमाने आणि उच्च श्रेणीतील दळणवळण यंत्रणा उभारत आहे. तसेच सीमेवर एनक्रिप्टेड कम्युनिकेशन टॉवर आणि भूमिगत फायबर ऑप्टिकल केबल्स बसवण्यातही चीनची मदत लाभत आहे.