पाक संघाचा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम
वृत्तसंस्था/कराची
2024-25 च्या क्रिकेट हंगामामध्ये पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकरिता भरगच्च क्रिकेट कार्यक्रम आयोजित केला आहे. या कालावधीत पाकचा क्रिकेट संघ विविध संघांसमवेत 9 कसोटी, 14 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळणार आहे.
येत्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडचा क्रिकेट संघ पाकच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्याच प्रमाणे बांगलादेश आणि विंडीजचे क्रिकेट संघ पाकचा दौरा करणार आहेत. सदर माहिती पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी दिली आहे. बांगलादेशचा संघ पाकबरोबर दोन कसोटी सामने खेळणार आहे. उभय संघातील पहिली कसोटी रावळपिंडीत 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान, दुसरी कसोटी कराचीत 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. पाक आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी मुल्तानमध्ये 7 ते 11 ऑक्टोबर, दुसरी कसोटी कराचीत 15 ते 19 ऑक्टोबर, तिसरी कसोटी रावळपिंडीत 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होईल. विंडीजचा संघ पाकच्या दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिली कसोटी 16 ते 20 जानेवारी दरम्यान कराचीत तर दुसरी कसोटी मुल्तानमध्ये 24 ते 28 जानेवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धा कार्यक्रमांशिवाय तिरंगी मालिका आयोजित केली आहे. या तिरंगी मालिकेत न्यूझीलंड, पाक आणि द. आफ्रिका यांचा समावेश आहे. आयसीसीची 2025 सालातील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना 9 मार्चला खेळविला जाईल. 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान मुल्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होणार आहे.
पाकचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया, झिंबाब्वे आणि द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यामध्ये 9 वनडे, 9 टी-20 आणि 2 कसोटी सामने 4 नोव्हेंबर ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहेत. 2020 नंतर प्रथमच बांगलादेशचा क्रिकेट संघ पाकचा दौरा करणार आहे. 2006 पासून विंडीज संघाने पाकबरोबर कसोटी मालिका खेळलेली नाही. पाकचा संघ बांगलादेश, इंग्लंड, द. आफ्रिका आणि विंडीज यांच्याबरोबर 9 कसोटी सामने खेळणार आहे. या मालिका 2023-25 च्या आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत आहेत.