अनिश्चित धोरणामुळे पाक संघाची पिछेहाट: अकिब
वृत्तसंस्था / लाहोर
अनिश्चित धोरणामुळे सध्या पाक संघाची पिछेहाट होत असून पाकच्या क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय क्रिकेटवर अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन पाकचा हंगामी प्रमुख प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवड समिती सदस्य अकिब जावेदने केले आहे.
अलिकडच्या कालावधीत पाक क्रिकेट संघाची सातत्याने पिछेहाट होत आहे. संघातील बरेच खेळाडू आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करु शकत नाहीत. या खेळाडूंनी आता चार दिवसांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सामन्यामध्ये खेळण्यावर भर द्यावा. त्यामुळे त्यांच्या दर्जामध्ये सुधारणा होऊ शकेल, अशी आशा अकिबने व्यक्त केली आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत विद्यमान विजेत्या पाक संघाला न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या सामन्यात सलग पराभव पत्करावे लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर बांगलादेश विरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे वाया गेला. पाक क्रिकेटला पुन्हा गतवैभव मिळवून द्यावयाचे असेल तर त्यांच्या कामगिरीमधील सातत्याने त्याचप्रमाणे पीसीबीच्या क्रिकेट धोरणामध्ये समन्वय राहणे जरुरीचे आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत पाक संघाचे कर्णधार, प्रशिक्षक, निवड सदस्य आणि चेअरमन यांच्यात वारंवार बदल झाल्याने त्याचा विपरित परिणाम पाक क्रिकेटवर झाल्याचे अकिबने म्हटले आहे.
राष्ट्रीय क्रिकेटशिवाय क्रिकेटपटूंमध्ये सुधारणा होऊ शकत नाही. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा तसेच त्यापूर्वी झालेल्या तीन देशांच्या वनडे मालिकेत पाक संघातील काही खेळाडूंनी म्हणावी तशी जबाबदारी उचलली नाही. याबद्दल अकिब जावेदने नाराजी व्यक्त केली आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकचे वेगवान गोलंदाज अपेक्षेप्रमाणे चांगली गोलंदाज करु शकले नाहीत. त्याच प्रमाणे भारताबरोबरच्या सामन्यावेळी साहजिकच पाकच्या गोलंदाजावर अधिक मानसिक दडपण जाणवले. पण त्यांना या दडपणात चांगली कामगिरी करता आलेली नाही, असे स्पष्टीकरण अकिब जावेदने वृत्तसंस्थेशी बोलताना दिले.