For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाक संघ पहिल्या डावात सुस्थितीत

06:45 AM Oct 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाक संघ पहिल्या डावात सुस्थितीत
Advertisement

इमाम उल हक, शान मसूद, सलमान आगा, रिझवान यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

रविवारपासून येथे सुरु झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 5 बाद 313 धावा जमविल्या. कर्णधार शान मसूद, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान आणि आगा यांनी अर्धशतके झळकाविली.

Advertisement

या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीचा शफीक रबाडाच्या गोलंदाजीवर 2 धावांवर पायचीत झाला. त्यानंतर इमाम उल हक आणि शान मसूद यांनी 47 षटकात दुसऱ्या गड्यासाठी 161 धावांची शतकी भागिदारी केली. शान मसूदने 147 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 76 धावा जमविल्या. सुब्रायनने त्याला पायचीत केले. मसूद बाद झाल्यानंतर इमाम उल हक मुत्थुसॅमीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 153 चेंडूत 1 षटकार अणि 7 चौकारांसह 93 धावा जमविल्या. इमाम उल हकचे शतक 7 धावांनी हुकले. दक्षिण आफ्रिकेच्या मुत्थुसॅमीने याच षटकातील आपल्या शेवटच्या चेंडूवर सौद शकिलला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. बाबर आझमने 48 चेंडूत 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या. हार्मेरने त्याला पायचीत केले. दक्षिण आफ्रिकेची स्थिती यावेळी 5 बाद 199 अशी होती.

मोहम्मद रिझवान आणि सलमान आगा यांनी पाकचा डाव सावरताना सहाव्या गड्यासाठी अभेद्य 114 धावांची भागिदारी केल्याने दिवस अखेर पाकने 90 षटकात 5 बाद 313 धावांपर्यंत मजल मारली. रिझवान 107 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 62 तर सलमान आगा 83 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 52 धावांवर खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेतर्फे मुत्थुसॅमीने 2 तर रबाडा, सुब्रायन आणि हार्मेर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात उपहारापर्यंत पाकने 28 षटकात 1 बाद 107 धावा जमविल्या होत्या. तर चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रात पाकने आणखी 3 गडी गमविताना 92 धावांची भर घातली. पाकची यावेळी स्थिती 57 षटकात 4 बाद 199 अशी होती. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये पाकने एकमेव गडी गमविताना 114 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावफलक - पाक प. डाव 90 षटकात 5 बाद 313 (इमाम उल हक 93, शान मसूद 76, मोहम्मद रिझवान खेळत आहे 62, सलमान आगा खेळत आहे 52, बाबर आझम 23, मुत्थुसॅमी 2-102, रबाडा, सुब्रायन आणि हार्मेर प्रत्येकी 1 बळी.

Advertisement
Tags :

.