पाकिस्तानकडून ओमानचा धुव्वा
आशिया चषक : पाकचा 93 धावांनी विजय : मोहम्मद हॅरिसचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ दुबई
आशिया चषक टी 20 स्पर्धेत शुक्रवारी खेळवल्या गेलल्या सामन्यात पाकिस्तानने ओमानचा 93 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकने मोहम्मद हॅरिसच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 7 बाद 160 धावा केल्या. यानंतर पाकच्या गोलंदाजासमोर ओमानचा डाव 67 धावांत आटोपला. आता, पाकची पुढील लढत दि. 14 रोजी भारताविरुद्ध होईल.
प्रारंभी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला पहिल्याच षटकात धक्का बसला. सलामीवीर सॅम आयुब गोल्डन डकवर शाह फैझलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर आलेल्या मोहम्मद हॅरिसचा सोपा झेल ओमानच्या आमीर कलीमने टाकला आणि तोच ओमानला चांगलाच महागात पडला. हॅरिसने 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना पाकिस्तानची गाडी रुळावर आणली. त्याने सलामीवीर साहिबजादा फरहानसह जोरदार फटकेबाजी केली. 11 व्या षटकात कलीमने पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. फरहान 29 धावा काढून माघारी परतला. बाद होण्यापूर्वी त्याने हॅरिससोबत 85 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर पुढच्या चेंडूवर कलीमने हॅरिसची मोठी विकेट मिळवली. हॅरिसने 43 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांसह 66 धावांचे योगदान दिले. पुढच्याच चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाला भोपळाही फोडता आला नाही. हसन नवाजही 9 धावांवर बाद झाला. फखर झमानने नाबाद 23 धावांची खेळी साकारत संघाला दीडशेपार नेले. मोहम्मद नवाजने 19 धावा फटकावल्या. ओमानच्या गोलंदाजांचा भेदक मारा आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेली निराशा यामुळे पाकला 7 बाद 160 धावापर्यंत मजल मारता आली. ओमानकडून आमिर कलीम आणि फैसल शाहने 3-3 विकेट घेतल्या. मोहम्मद नदीमला एक विकेट मिळाली.
ओमानचे 67 धावांत पॅकअप
पाकने विजयासाठी दिलेल्या 161 धावांचा पाठलाग करताना ओमानचा संघ 16.4 षटकांत 67 धावांत ऑलआऊट झाला. आमीर कलीम, शकील अहमद आणि हमीद मिर्झा वगळता च्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. हमीदने सर्वाधिक 27 धावा केल्या तर इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. पाककडून सुफियान, सईम आणि फहीम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पाकचा हा स्पर्धेतील पहिला विजय ठरला.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 20 षटकांत 7 बाद 160 (साहिबजादा फरहान 29, मोहम्मद हॅरिस 66, फखर झमान नाबाद 23, मोहम्मद नवाज 19, शाह फैजल आणि आमीर कलीम प्रत्येकी तीन बळी)
ओमान 16.4 षटकांतस सर्वबाद 67 (आमीर कलीम 13, हमीद मिर्झा 27, जतिंदर सिंग 1, मोहम्मद नदीम 3, फहीम अश्रफ, सुफियान आणि सईम आयुब प्रत्येकी 2 बळी)़