पाक-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून
केशव महाराजचे पुनरागमन, दोन्ही संघांचा फिरकी गोलंदाजीवर भर
वृत्तसंस्था/ रावलपिंडी
यजमान पाकिस्तान आणि विश्व कसोटी चॅम्पियन दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेत पाकने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा केवळ चार दिवसात 93 धावांनी पराभव करत मालिकेत आघाडी घेतली आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ हा दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. तर पाकचा संघ द. आफ्रिकेचा ‘व्हाईटवॉश’ करण्यासाठी सज्ज झाला आहे. या दुसऱ्या कसोटीत द. आफ्रिका संघात फिरकी गोलंदाज केशव महाराजचे पुनरागमन होणार आहे.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत हाताला झालेल्या दुखापतीमुळे केशव महाराज खेळू शकला नव्हता. लाहोरची पहिली कसोटी केवळ 4 दिवसात संपुष्टात आली. लाहोरची खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल झाल्याने या कसोटीत केवळ दोन्ही संघांचे गोलंदाज प्रभावी ठरले होते. पाक संघातील फिरकी गोलंदाज नौमन अलीने पहिल्या कसोटीत 11 गडी बाद करत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. पाकने मायदेशात होणाऱ्या मालिकांसाठी गोलंदाजीस अनुकूल ठरणाऱ्या खेळपट्ट्या बनवण्याचे धोरण अवलंबले असल्याचे जाणवते. यापूर्वी पाकने मायदेशात झालेल्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला होता. तर विंडीजबरोबरची मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली होती.
पाकबरोबरच्या मालिकेसाठी द. आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्करमकडे सोपवण्यात आले आहे. नियमित कर्णधार बवुमा या मालिकेसाठी दुखापतीमुळे उपलब्ध होऊ शकला नाही. रावळपिंडीच्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा हुकमी फिरकी गोलंदाज केशव महाराज प्रभावी ठरू शकेल. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 59 सामन्यात 203 बळी मिळविले आहेत. तर दक्षिण आफ्रिका संघातील नवोदीत फिरकी गोलंदाज एस. मुथुसॅमीने पाकविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 11 गडी बाद केले होते. मात्र, या सामन्यात मुथुसॅमीची हॅट्ट्रीक दोनवेळा थोडक्यात हुकली. दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत पाकची फिरकी जोडी नौमन अली आणि साजिद खान त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज व मुथूसॅमी यांच्यातच खरी कसोटी पाहावयास मिळणार आहे.
पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिका संघातील झोर्झीने शतक तर रिकेल्टनने अर्धशतक नोंदविले होते. पण दक्षिण आफ्रिकेच्या इतर फलंदाजांना पाकच्या फिरकी गोलंदाजीसमोर अधिक धावा जमवता आल्या नाहीत. रावळपिंडीची खेळपट्टी पूर्ण कोरडी असून, फिरकी गोलंदाजीला ती अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याने पाकचा संघ या सामन्यात तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरेल, असा अंदाज आहे. पाक संघातील प्रमुख फलंदाजांना या खेळपट्टीवर सावध फलंदाजी करावी लागेल. लाहोरच्या पहिल्या कसोटीत पाकचा कर्णधार शान मसूद, इमाम उल हक, रिझवान आणि सलमान अली आगा यांनी अर्धशतके झळकवल्याने पाकला पहिल्या डावात 378 धावापर्यंत मजल मारता आली होती.