पाकिस्तान शाहीन्सला सुपर ओव्हरमध्ये जेतेपद
वृत्तसंस्था / डोहा
आशिया चषक रायझींग स्टार्स 19 वर्षांखालील वयोगटातील येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पाकिस्तान शाहीन्सने पटकाविताना अंतिम सामन्यात बांगलादेश अ संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात पाक संघातील अहमद डॅनियलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या अंतिम सामन्यात बांगलादेश अ संघाने नाणेफेक जिंकून पाक शाहीन्सला प्रथम फलंदाजी दिली. पाक शाहीन्सचा डाव 20 षटकात 125 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेश अ संघाने 20 षटकात 9 बाद 125 धावा जमविल्याने सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे पंचांनी सुपर ओव्हरचा अवलंब केला. सुपर ओव्हारमध्ये बांगलादेशने 2 बाद 6 धावा जमविल्या. तर पाकने बिनबाद 7 धावा जमवित स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
पाक शाहीन्सच्या डावामध्ये साद मसुदने 26 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 38 तर अराफत मिनहासने 23 चेंडूत 4 चौकारांसह 25, सदाकतने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. कर्णधार इरफान खानने 9, शाहीद अझिजने 9, गाझी घोरीने 9 धावा केल्या. पाक शाहीन्सच्या डावात 4 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. बांगलादेश अ संघातर्फे रिपॉन मोंडलने 25 धावांत 3 तर रकिबुल हसनने 16 धावांत 2 तसेच मेहरुब, जिशान आलम, अब्दुल गफार सकलीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेश अ च्या डावामध्ये सलामीच्या हबिबूर रेहमान सोहनने 17 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 26, मेहरुबने 21 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 19, रकिबुल हसनने 21 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24, अब्दुल गफार सकलेनने 12 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 16 तर रिपॉन मोंडलने 9 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 11 धावा केल्या. बांगलादेश अ संघाच्या डावामध्ये 10 अवांतर धावा मिळाल्या. बांगलादेश अ च्या डावामध्ये 8 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. पाक शाहीन्सतर्फे सुफीयान मुक्कीम 11 धावांत 3, अराफत मिनहासने 5 धावांत 2 तर अहमद डॅनियलने 11 धावांत 2 गडी बाद केले. साद मसुद व सदाकत यांनी प्रत्येकी 1 गडी मिळविला. बांगलादेश अ ने 20 षटकात 9 बाद 125 धावा जमवित सामना टाय राखला.
सुपर ओव्हरमध्ये पाक शाहीन्सतर्फे अहमद डॅनियलला गोलंदाजीची संधी मिळाली. अहमद डॅनियलने आपल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बांगलादेश अ च्या सकलेनला खाते उघडण्यापूर्वी स्वत:च टिपले. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर जिशान आलमचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. बांगलादेश अ संघाने 1 षटकात 2 बाद 6 धावा जमविल्या. बांगलादेश अ संघाला या षटकात 5 अवांतर धावा मिळाल्या.
पाक शाहीन्सच्या सुपर ओव्हरमधील डावात सलामीच्या साद मसुदने 4 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 5 तर सदाकतने नाबाद 1 धावा तसेच त्यांना एक अवांतर धाव मिळाली आणि पाक शाहीन्सने एका षटकात बिनबाद 7 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक: पाकिस्तान शाहीन्स 20 षटकात सर्वबाद 125 (साद मसुद 38, अराफत मिनहास 25, माझ सदाकत 23, अवांतर 6, रिपॉन मोंडल 3-25, रकिबुल हसन 2-16, मेहरुब, झिशान आलम, अब्दुल गफार सकलेन प्रत्येकी 1 बळी). बांगलादेश अ 20 षटकात 9 बाद 125 (हबिबूर रेहमान सोहन 26, मेहरुब 19, रकिबुल हसन 24, अब्दुल गफार सकलेन नाबाद 16, मोंडल नाबाद 11, अवांतर 10, मुक्कीम 3-11, मिनहास व अहमद डॅनियल प्रत्येकी 2 बळी, साद मसुद व सदाकत प्रत्येकी 1 बळी).
सुपर ओव्हर: बांगलादेश 1 षटकात 2 बाद 6, पाकिस्तान शाहीन्स 0.4 षटकात बिनबाद 7