लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानकडून निर्मिती
अमेरिकेचा आरोप : कार्यक्रमांशी संबंधित चार कंपन्यांवर बंदी : मोठ्या प्रमाणावर विनाशाचा धोका
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानवर लांब पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनवल्याचा आरोप केला. याचदरम्यान क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित चार पाकिस्तानी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानची सरकारी एरोस्पेस आणि संरक्षण संस्था, नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स (एनडीसी) देखील समाविष्ट आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पाकिस्तानी कंपन्यांवरील बंदीबाबत माहिती दिली.
लांब पल्ल्याच्या विनाशकारी क्षेपणास्त्र कार्यक्रमात सहभागी असलेल्या चार पाकिस्तानी कंपन्यांवर आम्ही निर्बंध लादत आहोत. यामध्ये एफिलिएट्स इंटरनॅशनल, अख्तर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, रॉकसाइड एंटरप्राइझ या कंपन्यांचा समावेश असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवत्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले. नोव्हेंबर 2019 मध्ये पाकिस्तानने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या शाहीन-1 क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्याची रेंज 650 किमी पर्यंत असून ते सर्व प्रकारची शस्त्रे वाहून नेऊ शकते. याशिवाय पाकिस्तानने शाहीन-2 आणि शाहीन-3 क्षेपणास्त्रांची चाचणीही केली आहे.
पाकिस्तानची सारवासारव
अमेरिकेने केलेल्या आरोपानंतर आणि बंदीच्या निर्णयामुळे संतापलेल्या पाकिस्तानने आपण शांततेसाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनवत असल्याचा दावा केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी अमेरिकेच्या निर्णयाला दुर्दैवी आणि पक्षपाती ठरवले. अमेरिकेच्या बंदीमुळे आपल्या प्रादेशिक स्थिरतेला हानी पोहोचेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी हा कार्यक्रम आवश्यक होता, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानविरोधात कारवाई सुरूच राहील : अमेरिका
बंदी घातलेल्या कंपन्या पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी आवश्यक साधने पुरवत आहेत. अमेरिका भविष्यातही अशा कुरापतींविरुद्ध कारवाई करत राहील, असे सांगण्यात आले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची शाहीन-सिरीजची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs एनडीसीच्या मदतीने विकसित करण्यात आली आहेत. याशिवाय कराचीच्या अख्तर अँड सन्स प्रायव्हेट कंपनीवर एनडीसीला क्षेपणास्त्रांशी संबंधित मशीन खरेदीमध्ये मदत केल्याचा आरोप आहे. तसेच अन्य एक पाकिस्तानी कंपनी रॉकसाइड एंटरप्राइझ आणि एफिलिएट इंटरनॅशनलवरही पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात सहकार्य केल्याचा आरोप आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने चीनच्या तीन कंपन्यांना पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी तंत्रज्ञान पुरवण्यावर बंदी घातली होती. या यादीत बेलारूसच्या एका कंपनीचाही समावेश होता.