पाकिस्तान अफगाणवर प्रत्युत्तराच्या तयारीत
ख्वाजा आसिफ यांच्याकडून हल्ल्याची धमकी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये मंगळवारी झालेल्या दोन आत्मघाती हल्ल्यांमुळे देशाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिला हल्ला राजधानी इस्लामाबादमध्ये होऊन किमान 12 जणांचा मृत्यू झाला. तसेच 30 हून अधिक जण जखमी झाले. दुसरा हल्ला खैबर पख्तूनख्वामधील वाना येथील आर्मी कॅडेट कॉलेजमध्ये झाला. त्याठिकाणी चार ते पाच आत्मघाती हल्लेखोरांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली. या दोन्ही हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानला हल्ल्याची धमकी दिली आहे.
पाकिस्तानमधील हल्ल्यांनंतर संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी उघडपणे अफगाणिस्तानला लक्ष्य केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान सीमापार कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे म्हटले आहे. तसेच आसिफ यांनी अफगाण तालिबान सरकारवर दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आणि पाकिस्तानमध्ये अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
या हल्ल्यांनंतर अफगाणिस्तानात सीमापार कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणारे अफगाण तालिबान आपल्यासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. अफगाण तालिबानने हल्ल्यांचा केलेला निषेध हा केवळ एक दिखावा आहे. हल्ले त्यांच्याच हद्दीतून केले जात असल्याने त्यांचा निषेध प्रामाणिक वाटत नाही. त्यांनी भारतालाही या मुद्यात ओढत पाकिस्तान कोणत्याही कारस्थानाला उत्तर देण्यास सक्षम असल्याचे आसिफ म्हणाले. आम्हाला युद्ध नको असले तरी, कडक प्रत्युत्तराशिवाय कोणतीही आक्रमक कृती सहन केली जाणार नाही, असे ते पुढे म्हणाले.
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे तीन प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. सीमा वाद आणि दहशतवादावरून दोन्ही देशांमधील तणाव सतत वाढत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात दोन्ही देशांतील संघर्ष वाढला असून प्रत्यक्ष युद्ध आणि त्यांनंतर शस्त्रसंधी झाल्याचा प्रकारही घडला आहे.