रावळपिंडीत पाकिस्तान रडकुंडीला
6 बाद 26 नंतर बांगलादेशच्या सर्वबाद 262 धावा : लिटन दासचे शतक
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना रावळपिंडी खेळवला जात आहे. या सामन्यात एका क्षणी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अवघ्या 26 धावांत बांगलादेशच्या 6 खेळाडूंना बाद केले होते. बांगलादेशचा संघ 50 धावाही करु शकणार नाही, असे वाटत होते. पण अनुभवी लिटन दास बांगलादेशसाठी संकटमोचक ठरला. मोक्याच्या क्षणी शतक झळकावत त्याने पाकला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. लिटन दास व मेहंदी हसन मिराज यांच्या शानदार खेळीमुळे पाक गोलंदाजांना मात्र चांगलाच घामटा फुटल्याचे पहायला मिळाले. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 274 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशचा पहिला डाव 262 धावांवर आटोपला व पाकला अवघ्या 12 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही पाकची घसरगुंडी उडाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकने 2 बाद 9 केल्या होत्या.
दासचे शतक, मिराजचीही अर्धशतकी खेळी
पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाची शीर्ष फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली आणि 26 धावांत 6 विकेट पडल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मुशफिकुर रहीमला या सामन्यात केवळ 3 धावा करता आल्या. शकीब अल हसन, मोमीनल हक हे स्टार फलंदाज सपशेल अपयशी ठरल्या. अशा कठीण स्थितीत लिटन दास आणि मेहदी हसन मिराज यांनी डावाची धुरा सांभाळली. या दोन फलंदाजांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. मेहदी हसन मिराजने 124 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 78 धावा केल्या. तर लिटन दासने शानदार शतक झळकावले. त्याने दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. लिटन दासने 228 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 138 धावांची जबरदस्त खेळी केली. 26 धावांवर 6 विकेटवरून लिटन दास आणि मिराजने बांगलादेशला 262 पर्यंत नेले. दास बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव 78.4 षटकांत 262 धावांवर संपला.
पाकचा बब्बर शेर, प्रत्येक सामन्यात होतोर ढेर
दुसऱ्या डावात खेळताना पाकची पुन्हा खराब सुरुवात झाली. सलामीवीर अब्दुल्ला शफीक 3 धावा काढून बाद झाला. खुर्रम शहजादला भोपळाही फोडता आला नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकने 2 बाद 9 धावा केल्या होत्या. पाककडे आता 21 धावांची आघाडी आहे. दुसरीकडे, बांगलादेशच्या लिटन दासने शतक झळकावल्यानंतर पाकचा स्टार फलंदाज बाबर आझम सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. बाबर आझम पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीतही अपयशी ठरला. रावळपिंडी कसोटीत पहिल्या डावात 31 धावा करुन बाद झाला. विशेष म्हणजे, 2022 पासून आझमला शतक झळकावता आलेली नाही. मागील दोन वर्षात त्याचा फॉर्म खराब राहिला आहे. बांगलादेशविरुद्ध मालिकेत तो संघर्ष करताना दिसला. त्याच्या या खराब कामगिरीमुळे संघातील स्थान देखील धोक्यात आले आहे.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान प.डाव 274 व दुसरा डाव 3.4 षटकांत 2 बाद 9 (आयुब खेळत आहे 6, हसन मेहमुद 2 बळी)
बांगलादेश पहिला डाव 78.4 षटकांत सर्वबाद 262 (लिटन दास 138, मेहंदी हसन मिराज 78, हसन मेहमुद नाबाद 13, शहजाद 90 धावांत 6 बळी, मीर हमजा व सलमान आगा प्रत्येकी दोन बळी).