पाक-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द
वृत्तसंस्था / कोलंबो
आयसीसी महिलांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी हा सामना रद्द म्हणून घोषित केला. या निर्णयामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकच्या डावातील 25 षटकांचा खेळ झाल्यानंतर मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. पंचांनी पाऊस थांबण्याची बराचवेळ पाहिली. पण पावसाचा जोर कमी झाला असला तरी खेळपट्टी आणि मैदानावर ओलसरपणा असल्याने पंचांनी किमान तीनवेळा परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी हा सामना रद्द झाल्याचे जाहीर केले.
न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकचा निम्मा संघ 92 धावांत तंबूत परतला होत. मुनीबा अली आणि सोहेल यांनी डावाला सावध सुरूवात करुन देताना 40 चेंडूत 30 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या तेहुहूने सोहेलला 3 धावांवर पायचित केले. त्यानंतर जेस केरने मुनीबा अलीला झेलबाद केले. तिने 26 चेंडूत 4 चौकारांसह 22 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेली सिद्रा अमीन तेहुहूच्या गोलंदाजीवर झेल बाद झाली. तिने 1 चौकारासह 9 धावा केल्या. कार्सलने परवेजला झेलबाद केले. तिने 1 चौकारासह 10 धावा केल्या. अॅमेलिया केरने कर्णधार फातिमा सनाचा 2 धावांवर त्रिफळा उडविला. अलिया रियाजने 52 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 28 तर नवाजने नाबाद 6 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे तेहुहूने 2 तर जेस केर, अॅमेलिया केर आणि कार्सन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
स्पर्धेच्या ताज्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यातून 9 गुणांसह अग्रस्थान भक्कम केले आहे. द.आफ्रिका 8 गुणांसह दुसऱ्या तर इंग्लंड 4 सामन्यातून 7 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने 4 गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे. मात्र न्यूझीलंडने 5 सामन्यातून 4 गुण घेत पाचवे स्थान घेतले आहे. बांगलादेश 2 गुणांसह सहाव्या, लंका 2 गुणांसह सातव्या तर पाक 2 गुणांसह आठव्या आणि शेवटच्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक: पाक 25 षटकात 5 बाद 92 (मुनीबा अली 22, सोहेल 3, सिद्रा अमीन 9, अलिया रियाज नाबाद 28, परवेज 10, सना 2, नवाज नाबाद 6, अवांतर 12, तेहुहू 2-20, जेस केर, अॅमेलिया केर व कार्सन प्रत्येकी 1 बळी).