पाकिस्तान लपवू पाहतोय हानी
वृत्तवाहिन्या, सोशल मीडियावरून डिलिट करवतोय फोटो-व्हिडिओ
भारताने मागील काही दिवसांपासून जारी पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने 9-10 मेदरम्यान रात्री भारताची राजधानी नवी दिल्लीला स्वत:च्या फतेह क्षेपणास्त्राने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताच्या स्वदेशी हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. अशाचप्रकारे पाकिस्तानी लढाऊ विमानांनी श्रीनगरमधील वायुतळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, भारतीय वायुदलाने हा प्रयत्न उधळून लावला आहे. तसेच प्रत्युत्तरादाखल कारवाई करत पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने पाडल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानी हवाई सुरक्षा यंत्रणेला मातीमोल ठरवत त्याच्या चार वायुतळांचे मोठे नुकसान घडविले आहे. पाकिस्तानी सैन्य आता भारतीय हल्ल्यांमध्ये झालेले नुकसान लपविण्याच्या रणनीतिवर काम करत आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना या हानीचे वृत्तांकन करण्यापासून रोखण्यात आले आहे. भारतीय कारवाईशी निगडित कुठलेही वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना प्रसारित करण्याची अनुमती नाही. पाकिस्तानी सैन्याने भारतीय कारवाईमुळे झालेल्या नुकसानाशी निगडित दृश्यं दाखविण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. पाकिस्तानी सैन्याशी संबंधित अकौंट्सनी युजर्सना सोशल मीडियावर नुकसानीची छायाचित्रे पोस्ट न करण्याची सूचना केली आहे, तसेच यापूर्वी पोस्ट करण्यात आलेली छायाचित्रे हटविण्यास सांगितले आहे.
भारताने शुक्रवारी रात्री चार प्रमुख पाकिस्तानी वायुतळांना लक्ष्य केले आहे. या कारवाईत तेथील सैन्य यंत्रणांचे मोठे नुकसान झाले आहे. भारताकडून रावळपिंडीत नूर खान वायूतळ आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवालमध्ये मुरीद वायुतळ, शोरकोटमध्ये रफीकी वायुतळ आणि रहीम यार खान वायुतळाला लक्ष्य करत यशस्वी हल्ला करण्यात आला. भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानच्या या चारही वायुतळांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
स्थानिक लोकांनी या हानीला दर्शविणारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात भारतीय क्षेपणास्त्रांनी वायुतळावर घडवविलेले नुकसान दिसून येते. परंतु पाकिस्तानी सैन्य आता ही छायाचित्रे आणि व्हिडिओ डिलिट करवित आहे.