For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तान दहशतवादाची फॅक्ट्री

06:30 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तान दहशतवादाची फॅक्ट्री
Advertisement

ब्रिटनमध्ये भारतीय समुदायाची निदर्शने : पहलगाम हल्ल्याची निंदा

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

भारतीय समुदायाने ब्रिटनची राजधानी लंडन येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने केली आणि जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निंदा केली आहे. भारतीय ध्वज, बॅनर आणि फलक हातात घेत भारतीय लोकांनी पहलगाम हल्ल्याच्या पीडितांसाठी यावेळी न्यायाची मागणी केली आणि पाकिस्तान म्हणजे दहशतवादी फॅक्ट्री असल्याचा आरोप केला आहे. या निदर्शनांमध्ये ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या लोकांनी मोठ्या संख्येत भाग घेतल्याचे चित्र दिसून आले.

Advertisement

लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शकांनी दहशतवादाच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि अशाप्रकारच्या हल्ल्यांसाठी जबाबदार दहशतवादी समुहांना समर्थन अन् आसरा देण्यासाठी पाकिस्तानवर टीकाव केली आहे. निदर्शकांनी यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या आहेत. तसेच त्यांनी ‘मी हिंदू आहे’ या आशयाचा मजकूर असलेले फलक झळकविले आहेत.

आम्ही भारतीय येथे पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी एकत्र आलो आहोत. पाकिस्तानने दहशतवादाच्या फॅक्ट्रीला जन्म दिला आहे. या पाकिस्तानी दहशतवाद्यांमुळे पहलगाममध्ये आमचे 26 जण मारले गेले. आम्ही याच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी एकत्र आलो आहोत असे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने म्हटले आहे. पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे ब्रिटनमध्ये राहणारा भारतीय समुदाय आक्रोशात असल्याचे अन्य एका निदर्शकाने सांगितले आहे.

पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने

पाकिस्तानी दूतावासाच्या बाहेर निदर्शने करत आम्ही भारताबद्दल आमची एकजूटता आणि सन्मान व्यक्त करत आहोत. हे एक शांततापूर्ण निदर्शन असून यात सर्व भारतीयांची भागीदारी असल्याचे एका भारतीय वंशाच्या नागरिकाने सांगितले आहे. आम्ही भारताचे समर्थन करतो, कारण आम्ही एकाच शत्रूचा सामना करत आहोत, धार्मिक कट्टरवाद. पहलगाममध्ये जे घडले, ते इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याची आठवण करून देणारे हेते असे उद्गार ब्रिटनमधील एका ज्यूधर्मीयाने काढले आहेत.

पाकिस्तानी मुत्सद्याचे आक्षेपार्ह कृत्य

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात लंडन येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर भारतीय वंशाच्या लोकांनी शांततेच्या मार्गाने निदर्शने केली आहेत. यादरम्यान पाकिस्तानच्या एका वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याने निदर्शकांना गळा कापण्याचा इशारा करत आगीत तेल ओतण्याचे काम केले. पाकिस्तानी अधिकारी स्वत:च्या हातात भारतीय वायुदलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांचे पोस्टर घेऊन उभा होता आणि दुसऱ्या हातात चहाचा कप घेत निदर्शने करणाऱ्या भारतीयांची थट्टा करू पाहत होता. पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानच्या सैन्य अधिकारी आणि मुत्सद्यांमध्ये शिष्टाचाराची कमतरता स्पष्टपणे दिसून येत असल्याची टिप्पणी सोशल मीडियावर होत आहे. तर दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी संबंधित पाकिस्तानी अधिकाऱ्याला प्रथम स्वत:चा गळा वाचव अशी इशारावजा सूचना केली आहे.

Advertisement
Tags :

.