राजकीय अस्थिरतेच्या भोवऱयात पाकिस्तान
संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेऊ शकतात शरीफ : निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
पाकिस्तानात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम उत्पादनांची किंमत वाढविण्याचा निर्णय टाळण्यासाठी अलिकडेच पंतप्रधान झालेले शाहबाज शरीफ हे संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेऊ शकतात. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे नवे पंतप्रधान पुढील निवडणुकीत स्वतःची आणि स्वतःचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)ची प्रतिमा जपण्यासाठी सरकारमध्ये सामील आघाडीच्या प्रमुख नेत्यांना स्वतंत्रपणे भेटून एका निर्णयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान शाहबाज यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख आसिफ अली झरदारी, जमात उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख मौलाना फजल-उर-रहमान आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे संयोजक खालिद मकबूल यांच्याशी इस्लामाबादमध्ये स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. वाढता आर्थिक आणि राजकीय दबाव पाहता शाहबाज हे स्वतःचे मंत्रिमंडळ भंग करू शकतात.
निवडणूक अंतिम पर्याय
आर्थिक अस्थैर्यामुळे दीड महिन्यात दुसऱयांदा पाकिस्तान अत्यंत गंभीर राजकीय अस्थिरतेच्या तावडीत सापडला आहे. सर्वात मोठे संकट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटींनुसार पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढविण्याच्या निर्णयावरून आहे. किमीत वाढविण्यात आल्यास जनतेत आक्रोश निर्माण होत सत्तारुढ आघाडीला नुकसान होण्याची भीती आहे. कमीत कमी 16 महिन्यांपर्यंत सरकार चालवू असे म्हणणारे राजकीय नेते आता केवळ 40 दिवसांमध्येच निवडणूक अंतिम पर्याय असल्याचे म्हणत आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यानुसार कुठल्याही निर्णयासाठी पंतप्रधान शाहबाज हे देशाला संबोधित करून जनतेला विश्वास घेतच पाऊल उचलणार आहेत.
सैन्याची मदत आवश्यक
सैन्याच्या समर्थनाशिवाय आघाडी सरकारला पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आर्थिक मदत मागण्यासारखे साहसी पाऊल उचलणे अवघड आहे. अशा स्थितीत स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी शाहबाज शरीफ हे संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेऊ शकतात. शाहबाज यांच्या प्रयत्नांनंतरही चीन, सौदी अरेबिया, युएई, अमेरिका यासारख्या देशांनी पाकिस्तानसाठी मदतनिधीची घोषणा केलेली नाही.