For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानला मिळाले सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व

06:16 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानला मिळाले सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व
Advertisement

सोमालिया, डेन्मार्क, ग्रीस, पनामाचीही निवड

Advertisement

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ

पाकिस्तानसमवेत 5 देशांची 2025 पासून सुरू होणाऱ्या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे. 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने गुप्त मतदानाच्या माध्यमातून रिक्त पाच जागांसाठी निवड केली आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुरक्षा परिषदेत पाच स्थायी तर 10 अस्थायी सदस्य असतात. अस्थायी सदस्यांच्या रिक्त पाच जागांकरिता मतदान झाले. या निवडणुकीत पाकिस्तान, सोमालिया, डेन्मार्क, ग्रीस आणि पनामा या देशांची अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

आफ्रिका आणि आशिया-प्रशांत देशांसाठी आलेल्या दोन जागांसाठी सोमालियाला 179 तर पाकिस्तानला 182 मते मिळाली आहेत. दक्षिण अमेरिकन आणि कॅरेबियन देशांसाठी पनामाला 183 आणि पश्चिम युरोपीय आणि अन्य देशांसाठी डेन्मार्कला 184 तर ग्रीसला 182 मते मिळाली आहेत. हे नवे सदस्य देश आता जपान, मोझाम्बिक, इक्वेडोर, माल्टा आणि स्वीत्झर्लंडची जागा घेणार आहेत. या देशांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी समाप्त होणार आहे. पाच नव्या सदस्यांचा कार्यकाळ एक जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पाकिस्तान जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला साथ देण्याकरता उत्सुक आहे. आम्ही देशांदरम्यान शांतता, स्थैर्य आणि सहकार्याला चालना देण्यासाठी आमची भूमिका निभावणे जारी ठेवू असे उद्गार शरीफ यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.